मतांच्या लाचारीमुळे कत्तलखान्यांवर कारवाई नाही ः वहाडणे कोपरगावच्या नगराध्यक्षांचा आंदोलनाला पाठिंबा; प्रवीण दरेकरही येण्याची शक्यता

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरात राज्यातील सर्वाधिक प्रमाणात गोहत्या होत असल्याचे गेल्या काही वर्षात समोर आले आहे. मतांच्या लाचारीमुळे त्याला राजकीय आशीर्वादही मिळाला आहे. अशा कृत्यातून जर बहुसंख्य लोकांच्या भावनांशी कोणी खेळ खेळला जात असेल तर काळ अशा प्रवृत्तीला कधीही माफ करणार नाही. गोहत्या रोखणं हा राजकीय विषय होवू शकत नाही. व्यक्तिगत जीवनात वावरतांना समाजाचा सवंग विचार करण्याची गरज आहे. मात्र संगमनेरात मुठभर लोकांचे हित सांभाळण्यासाठी सर्रास बहुसंख्य समुदायाच्या भावना पायदळी तुडविल्या जात असल्याने त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. संगमनेरातील गोहत्या थांबविण्यासाठी सुरु झालेले आंदोलन निर्णायक आहे, ते तडीस जाईपर्यंत संगमनेरकरांनी त्यामागे ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज येथे केले.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलासह विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी संगमनेरातील गोवंश कत्तलखाने कायमस्वरुपी बंद करण्यासह येथील कत्तलखाने सुरु ठेवण्यासाठी त्यांना पाठबळ देणार्या पोलीस अधिकार्यांवर कारवाईसाठी मंगळवारपासून (ता.12) येथील प्रशासकीय भवनासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या आजच्या दुसर्या दिवशी नगराध्यक्ष वहाडणे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक प्रशांत बेल्हेकर, बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक कुलदीप ठाकूर, ज्येष्ठ नेते प्रा. एस. झेड. देशमुख, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर करपे आदिंसह हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व गोप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना वहाडणे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे सुरुवातीचे निवडणूक चिन्ह बैलजोडी व नंतर गाय-वासरु होते. त्याचा वापर करुन या पक्षाने देशावर राज्यही केले आहे, मात्र त्या पक्षाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना आत त्याचा विसर पडला आहे. एखाद्या समाजातील मुठभर लोकांच्या कृत्यामूळे जर बहुसंख्य समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार असतील तर अशा गोष्टी विनाविलंब बंद व्हायला पाहिजे. संगमनेरचे लोकप्रतिनिधी येथील गोहत्या शंभर टक्के बंद करु शकतात, मात्र केवळ मतांच्या लाचारीमुळे ते काहींच्या दाढ्या कुरवाळीत आहेत. एखाद्या समुदायाच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार त्यांना महागात पडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला होता, त्याचाही समाचार वहाडणे यांनी आपल्या भाषणातून घेतला. आपल्या संस्कृतीत शत्रूच्या जन्मदिनी त्याचेही अभीष्टचिंतन करण्याची पंरपरा असतांना येथील युवानेत्याने ती पायदळी तुडविण्याचे काम केल्याचे सांगतांना मोदींचा वाढदिवस जर बेरोजगार दिन असेल तर मग येथील मंत्र्यांचा वाढदिवस गो हत्या दिन म्हणून का साजरा केला जावू नये असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येथील कत्तलखान्यावरील कारवाईत काही गोष्टी समोर आल्या असून गोहत्याची ठिकाणं सुरु राहण्यासाठी महिन्याकाठी तीस लाखांची लाच वाटली जात असल्याचे समोर आले आहे. गोहत्या रोखण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते जर लाच घेवून त्याचे समर्थन करीत असतील तर समाजाने एकजूट होवून अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्याची गरज असून संगमनेरकरांनी गो हत्येचा विरोधात सुरु झालेल्या या आंदोलनात सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

गांधी जयंतीच्या दिवशी संगमनेरातील कत्तलखान्यांवर झालेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या कारवाईनंतर येथील गोवंशाची कत्तल पूर्णतः थांबावी व येथील कत्तलखान्यांना पाठबळ देणार्या पोलीस अधिकार्यांवर कारवाई व्हावी यासाठी हिंदुत्त्ववादी संघटनांकडून संगमनेरात ठिय्या आंदोलन सुरु असून आज सलग दुसर्या दिवशीही कार्यकर्ते प्रशासकीय भवनाच्या बाहेर ठाण मांडून बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांसह राज्यपातळीवरील नेत्यांनाही संगमनेरात आणून स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असून भारतीय जनता पार्टीचे वरीष्ठनेते प्रवीण दरेकर यांनाही संगमनेरात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात गायी देखील गोळा झाल्या होत्या. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी घासही आणला होता. एकीकडे गोहत्या थांबाव्यात यासाठी कार्यकर्ते ठिय्या देत असतांना दुसरीकडे मोठ्या संख्येने गायींची उपस्थिती आंदोलकांचा उत्साह दुणावणारी ठरत असल्याची प्रतिक्रीया यावेळी काही कार्यकर्त्यांनी दिली. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून मंगळवार दुपारी साडेबारा वाजेपासून हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते येथे ठाण मांडून बसले आहेत.

येथील कत्तलखान्यांना स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद असल्यानेच इतक्या मोठ्या प्रमाणात कत्तली सुरु असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी पोलीस निरीक्षकांच्या बदलीसह अन्य तीन मागण्या पूर्ण करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मात्र जिल्हा यंत्रणेकडून त्याकडे फारसे गांभिर्याने पाहीले जात नसल्याने मंगळवारी या आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर आदींशी संपर्क साधण्यात आला असून त्यांना येथील आंदोलनाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या आंदोलनाची धार वाढून त्याचे पडसाद राज्यपातळीवर उमटण्याचीही शक्यता आहे.
