साई परिक्रमेसाठी शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलापथकांनी वेधले लक्ष

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबांनी सुमारे 111 वर्षांपूर्वी शिर्डीभोवती आखलेल्या सीमारेषवरून हजारो भाविकांनी रविवारी (ता.13) पहाटे परिक्रमा केली. साईबाबा संस्थान, ग्रीन अँड क्लिन शिर्डी संस्था आणि शिर्डीतील ग्रामस्थ यांच्यावतीने गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये आज संत-मंहत, आमदार-खासदार, पदाधिकारी यांच्यासह हजारो भाविक सहभागी झाले होते. करोनाचे सावट सरले असल्याने ही परिक्रमा उत्साहात पार पडली.

शिर्डी युवा ग्रामस्थ, द्वारकामाई मित्र मंडळ, सन्मित्र मंडळ, छत्रपती शासन, क्रांती युवक मंडळ, शिवनेरी मित्रमंडळ यांच्यासह अनेक संस्था, संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी यात सहभाग नोंदवला. यामध्ये मध्य प्रदेशातून बोलावण्यात आलेले खास कला पथक तसेच शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांची कलापथकेही सहभागी झाली होती. साईबाबांचा चित्ररथ, विविध वाद्यवृंद यांचा समावेश होता. खंडोबा मंदिर येथून सकाळी 6 वाजता यात्रेला सुरुवात झाली. साई परिक्रमा रथाचे पूजन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज व काशिकानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कैलासबापू कोते, माजी नगराध्यक्षा अर्चना कोते, विश्वस्त महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, सचिन गुजर, अविनाश दंडवते यांच्यासह शिर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

परिक्रमा मार्गावर रांगोळ्या काढून भविकांचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी चहा-नाश्ताची सोय करण्यात आली होती. महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेथील जड वाहतूक बाह्यवळण मार्गाने वळवण्यात आली होती. साईनामाचा गजर आणि घोषणा देत साईभक्तांनी तब्बल 13 किलोमीटरची ही परिक्रमा पूर्ण केली. त्यासोबतच मार्गावर स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली. दरम्यान, साईबाबांच्या हयातीत 1911 -12 या काळात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी बाबांनी शिर्डी गावच्या सीमेवर पिठाची रेषा आखली होती. बाबांच्या हयातीत या मार्गावरून ते परिक्रमा करत, असं सांगण्यात येते. हीच परंपरा अलीकडे शिर्डीत नव्याने सुरू करण्यात आली आहे. पहिल्यावर्षी जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढे करोनामुळे व्यत्यय आला होता. आता ती पुन्हा उत्साहात सुरू करण्यात आली आहे.

Visits: 102 Today: 2 Total: 1102673

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *