पोलीस अधीक्षक साहेब थोडं संगमनेरकडे लक्ष द्या हो! भयभीत नागरिकांचे साकडे; शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा घरफोडी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वैभवशाली शहराची शेखी मिरवणार्‍या संगमनेर शहराची सध्याची अवस्था अतिशय बिकट बनली असून चोरट्यांच्या भयाने नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत. मात्र सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात शहर पोलीस सातत्याने अपयशी ठरत आहेत. एकीकडे दररोज घडणार्‍या वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना आणि दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झालेले गुन्ह्यांचे तपास यामुळे शहरात पोलिसांचे अस्तित्व आहे की नाही अशीही शंका निर्माण झाली आहे. संगमनेरकरांच्या भीतीत सोमवारी आणखी भर पडली असून दरोड्याच्या घटनांची सुरुवात झालेल्या सुकेवाडीतील दुकान फोडून चोरट्यांनी किंमती कपडे व अन्य काही चीजवस्तू घेवून पोबारा केला आहे. नेहमीप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार उरकून पुढील गुन्ह्याची प्रतीक्षा सुरु केली आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात सुकेवाडीतील सविता विशाल गोसावी या गृहिणीने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गावात त्यांच्या घराच्या पुढ्यातच कपड्याचे व किराणा मालाचे छोटेसे दुकान आहे. चोरट्यांनी त्यांचे दुकान लक्ष्य करीत सोमवारी पहाटे ते फोडून आत प्रवेश केला. यावेळी संपूर्ण दुकानात उचाकापाचक करीत चोरट्यांनी 20 जीन्स पँट, 30 भारीतल्या साड्या, लहान मुलांच्या कापडांचे 13 जोड, 50 पैठणी आणि 40 शर्टसह चक्क बिस्किटाचे व तंबाखूचे बॉक्सही चोरुन नेले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक विजय पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

दोन महिन्यांपूर्वी सुकेवाडीतील उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीवर सहा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घातला होता. गेल्या काही महिन्यांत संगमनेर तालुक्यात घडलेली ही पहिलीच घटना होती. या घटनेनंतर पोलिसांनी शहर सुरक्षेबाबत ठोस कृती करण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र सुकेवाडीतील या धटनेच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या अवतीभोवती अशा घटनांची साखळीच सुरु झाली. त्यामुळे सुकेवाडीसह खांजापूर, घुलेवाडी, समनापूर, गुंजाळवाडी अशा भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यासंपूर्ण घटनाक्रमाला आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे, मात्र पोलीस यातील एकाही गुन्ह्याची उकल करण्यात अपयशी ठरले आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसह सध्या उपविभागीय पोलीस अधिकारीही प्रभारीच लाभले आहेत. त्यातच पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी गणेशोत्सवानंतर लागलीच बदलीसाठीचा अर्ज दिल्याने प्रत्येक गुन्ह्यानंतर ते हात वर करीत आहेत. त्याचा परिणाम पोलीस ठाण्यातील बहुतेक दुय्यम अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये मनमानी भिनली असून पोलिसांकडून केवळ चिरीमिरीच्या विषयांवरच लक्ष्य केंद्रीत झाल्याने संगमनेरची सामाजिक स्थिती अगदी लयाला गेली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनीच शहराच्या बिघडलेल्या शांतता व सुव्यवस्थेकडे लक्ष्य द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.


गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याची घटना समोर आली होती. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून संदेश आल्यानंतर त्यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या एका दुय्यम अधिकार्‍याला तत्काळ घटनास्थळी जाण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी गोवंश जनावरे पकडली गेल्याने संबंधित अधिकारी त्या जनावरांच्या मालकाशी तडजोड करण्यातच व्यस्त राहिले, त्यामुळे गस्तीवर असलेल्या व चोरट्यांना जेरबंद करणार्‍या दोघा कर्मचार्‍यांच्या जीवावर बेतणारा प्रसंग उभा राहीला होता अशी माहितीही आता खुद्द पोलीस वर्तुळातूनच समोर येत आहे. पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करीत असून अन्य पोलीस कर्मचार्‍यांमध्येही त्याने धाक निर्माण केला आहे. यावरुन संगमनेर शहर पोलीस ठाण्याची बिघडलेली अवस्था स्पष्टपणे दिसून येते.

Visits: 78 Today: 2 Total: 114669

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *