अकोल्याचे भूमिपुत्र पोलीस निरीक्षक बांगर यांना राष्ट्रपती पदक जाहीर
अकोल्याचे भूमिपुत्र पोलीस निरीक्षक बांगर यांना राष्ट्रपती पदक जाहीर
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील अतिदुर्गम चिंचोडी गावातील सूर्यकांत गणपत बांगर (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई) यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असे त्रिसूत्री धोरण वापरून आपले कार्य कर्तृत्व पोलीस खात्यात दाखविले. त्याबद्दल यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे हस्ते मुंबई पोलीस मुख्यालय येथे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, राज्यपाल यांच्या हस्ते स्वतंत्र समारंभात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

बांगर हे राज्य लोकसेवचा अभ्यास करून 1990 मध्ये पहिल्या प्रयत्नात पास होऊन पोलीस खात्यात अधिकारी म्हणून रुजू झाले. रत्नागिरी, रायगड, ठाणे, बुलढाणा, धारावी, मुंबई याठिकाणी अविरतपणे 29 वर्षे सेवा केली. बुलढाणा येथे ‘सिंघम’ म्हणून ते प्रसिद्ध होते. 400 गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने लावल्याबद्दल विशेष पदक प्राप्त करणारे पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. आता धारावी झोपडपट्टी पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षकक म्हणून ते कार्यरत असून भारत सरकार व पोलीस खात्याने त्यांची 29 वर्षे गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय सेवा केली म्हणून राष्ट्रपती पदक जाहीर केले आहे. याबद्दल बांगर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
