बालमटाकळीच्या तलाठ्यावर वाळूतस्करांचा प्राणघातक हल्ला घटनेच्या निषेधार्थ शेवगाव तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन

नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील बालमटाकळी येथील कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे यांच्यावर अज्ञात तीन वाळूतस्करांनी लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन प्राणघातक हल्ला केला. हा प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत.

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे यांना गुप्त खबर्यामार्फत माहिती मिळाली की, बालमटाकळी या गावात वाळूचा एक ट्रॅक्टर वाळू भरून घेऊन येत आहे. त्यानुसार त्यांनी गावात असलेल्या श्री बालंबिका देवी मंदिराजवळ सदरील ट्रॅक्टर पकडले आणि ते घेऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयात घेऊन येत असताना वाळू तस्करांनी शेवगाव-गेवराई महामार्गावर असणार्या सोनेरी फाट्याजवळ प्राणघातक हल्ला केला.

सोनेरी फाट्याजवळ अज्ञात तीन वाळूतस्करांनी हा वाळूचा ट्रॅकटर अडवून तलाठी अंधारे यांना लाकडी दांडक्याने जबर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तलाठी यांच्या डोक्याला, हाताला, खांद्याला आणि शरीरावर जबर मारहाण होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यांच्यावर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अहमदनगर येथे रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले आहे. तसेच त्या घटनास्थळावरून त्या तिन्ही हल्लेखोर वाळूतस्करांनी वाळूचा ट्रॅकटर पळवून नेला आहे. वाळूतस्करांचा मुजोरपणा अधिकार्यांना देखील प्राणघातक ठरू लागल्याने आता वाळूतस्करांवर अधिकार्यांची करडी नजर राहणार आहे.

बालमटाकळी येथील तलाठी बाबासाहेब अंधारे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा महसूल कर्मचार्यांनी निषेध केला आहे. तसेच संबंधित हल्लेखोरांवर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी व त्यांना अटक होईपर्यंत शेवगाव तालुका महसूल कर्मचारी संघटना काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
