अकोले आगारातील बसेसच्या फेर्या सुरळीत करा ः मेंगाळ अन्यथा आगाराचे प्रवेशद्वार बंद करण्याचा दिला इशारा

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना आणि पासधारक विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आगारातील एकही बस वेळेत सुरू नसल्याने एसटी बसने प्रवास करणार्या विद्यार्थांचे मोठे हाल होत आहे. सकाळपासून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी बसस्थानकावर उपाशीपोटी उभी राहतात. याची पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी दखल घेत अकोले आगाराला बसेसच्या फेर्या वेळेत सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आगाराचे प्रवेशद्वार बंद करु अशा इशारा दिला आहे.

अकोले तालुक्यातील एकही बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळी अकोलेला येण्यासाठी बस आहेत. मात्र शाळा, महाविद्यालय सुटल्यावर दुपारी व सायंकाळी घरी कधी जातील याचा काही नियम राहिला नाही. अनेक गावांच्या बसेस आगाराने बंद केल्या आहेत. कमी गाड्यांमध्ये पूर्ण तालुक्याचे नियोजन करताना कर्मचार्यांची दमछाक होत आहे. या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थी अक्षरशः वैतागले आहेत. त्यामुळे त्यांनी माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्याशी संपर्क साधत तक्रार केली. त्यांनी तत्काळ अकोले बसस्थानक गाठून संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना बसेस वेळेत सोडायला भाग पाडले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी अकोले आगाराने घ्यावी. जरी बसगाड्या कमी असल्या तरी आहे त्या गाड्यांचे योग्य पद्धतीने नियोजन करून फेर्या नियमित कराव्यात. यावी अन्यथा अकोले आगारातील एकही बस आम्ही रस्त्यावर फिरू देणार नसल्याचाही इशारा माजी उपसभापती मारुती मेंगाळ, सुरेश पथवे, बाळासाहेब मधे, विशाल काळे, ऋषी लगड, दीपक कासार, राहुल जाधव, विशाल वाघमारे, भरत गिर्हे, मारुती सोमा मेंगाळ आदिंनी दिला आहे.
