कुख्यात सागर भांड टोळीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटकेंनी केला तपास

नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्यांकरीता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. या टोळीविरोधातील सबळ पुरावे श्रीरामपूर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी गोळा करुन विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेत.

राहुरी पोलिसांत मयूर दिलीप देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.711/2021 भादंवि 395, 397, 341, 506 आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा कुख्यात सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांडसह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटितपणे हिंसाचाराचा वापर करून जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांडचे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते. तरी देखील आरोपीस कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलिसांकडून करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांना सादर केला होता. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. सागर भांड विरुद्ध दरोडा, अपहरण, फसवणूक, अवैध शस्त्र वापर असे तब्बल 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा फौजदारी कट रचून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने 120 (ब) व गुन्हा करून पुरावे नष्ट केला म्हणून भादंवि कलम 201 प्रमाणे तपासी अधिकारी यांच्याकडून वाढीव कलमे लावण्यात आली. या गुन्ह्यात कुख्यात सागर भांड टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999चे कलम 3(1) (2), 3 (2) व 3 (4) (मोक्का) अन्वये अप्पर पोलीस महासंचालक यांचे आदेश मिळाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सदर गुन्ह्यांचे दोषारोपपत्र विशेष मोका न्यायालयात दाखल केले आहे.

Visits: 125 Today: 1 Total: 1111977

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *