अतिवृष्टीने पठारभागातील कांद्याची रोपे सडली
अतिवृष्टीने पठारभागातील कांद्याची रोपे सडली
शेतकर्यांचे मोठे नुकसान; कांद्याचे क्षेत्र घटण्याचीही शक्यता
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील घारगावसह मुळा खोरे परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात गावठी कांद्याची रोपे टाकली होती. परंतु अतिवृष्टीने कांद्याची रोपे सडून चालली आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून आता गावठी कांद्याचे घरगुती बी देखील मिळत नसल्याने यावर्षी कांद्याचे क्षेत्र घटते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घारगाव, साकूरसह मुळा खोरे परिसरातील व पठारभागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गावठी कांद्याची लागवड करतात. ही लागवड करण्यासाठी शेतकरी घरीच कांद्याचे बियाणे तयार करतात. परंतु मागील वर्षी खराब वातावरणामुळे शेतकर्यांच्या घरी कमी प्रमाणातच बियाणे तयार झाले. यामुळे मागील वर्षी हजार रूपये किलोने मिळणारे बियाणे आता चार हजार रुपये किलोने घेण्याची नामुष्की शेतकर्यांवर ओढवली होती. परंतु एवढे करूनही शेतकर्यांनी कांदा बियाणे खरेदी करून आपल्या शेतात रोप बनविण्यासाठी टाकले होते. परंतु यंदा वरुणराजाचा मूड काही औरच असल्याने अक्षरशः शेतकर्यांच्या नाकी नऊ आणत संपूर्ण कांद्याची रोपे सडली आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी पुन्हा मिळेल त्या भावाने कांद्याचे बी खरेदी करून रोपे टाकली होती.

पुन्हा शनिवारी ढगफुटी सदृश्य पावसामुळे कांद्याची रोपे पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. शेतांना तर नदीचे स्वरूप आले होते. जिकडे पाहवे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. तसेच काढणीसाठी आलेला सेंद्रीय लाल कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्या तरी कांद्याचे बाजारभाव वाढले आहे. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी पुन्हा दहा ते बारा हजार रुपये पायलीने कांद्याचे बी खरेदी केले आहे. तर आता घरगुती कांद्याचे बियाणे मिळत नसल्याने अनेक शेतकर्यांनी कृषी केंद्रामधून बी खरेदी केले. परंतु पावसाने उघडीप दिल्यावरच रोप टाकण्याचा निर्णय काही शेतकर्यांनी घेतला आहे. सध्या तरी शेतकर्यांनी टाकलेल्या गावठी कांद्याची रोपे सडून गेली असून पिवळीही पडली आहेत. यामुळे पावसाने शेतकर्यांच्या मोठ्या नुकसानी झाल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.

