स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधम बापाला अटक साई संस्थानच्या सतर्क कर्मचार्‍यांमुळे सापडला पोलिसांच्या जाळ्यात


नायक वृत्तसेवा, शिर्डी
रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारा भयंकर प्रकार समोर आला आहे. शिक्षणाचं माहेरघर असणार्‍या पुणे येथे स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गर्भवती करणारा नराधम बाप फरार झाला होता. शेवटी शिर्डी येथून त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत शिर्डी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की श्री साईबाबा संस्थानचे कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना मागील तीन दिवसांपासून एक इसम संशयितरित्या साई उद्यान येथे राहत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी ही माहिती तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना दिली. त्यांनी सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली, की माझ्याविरुद्ध पुणे येथील वानवडी पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने दीड महिन्यापासून बेंगलोर, राजस्थान, बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे.

त्यावरुन वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपीबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सदर आरोपीविरुद्ध १० नोव्हेंबर, २०२३ रोजी आमच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीने (वय ५०) स्वतःच्या अल्पवयीन मुलीला (वय १६) जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल २०२३ पासून वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या सात महिन्यांची गरोदर आहे. त्यावरुन त्याच्यावर गुरनं.५४७/२०२३ भादंवि कलम ३७६ (२)(एफ),(जे), ३७६(२)(३),(एन), ३२३, ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ५(जे),(२), ५(एल), ६, ८, १२ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो फरार असल्याचे कळवले. शेवटी साई संस्थानच्या सतर्क अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे नराधम बापाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपीस पुढील तपासाकामी वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Visits: 162 Today: 1 Total: 1598240

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *