कोविडने घेतला संगमनेर तालुक्यातील अठ्ठाविसावा बळी..! सलग दोन दिवसांत दुसरा बळी गेल्याने संगमनेर तालुक्यात पसरली शोककळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढतच असून दररोज रुग्णवाढीचे नवनवीन विक्रम समोर येत आहेत. त्यातच कोविडची बाधा झाल्याने मृत्युसारख्या भयंकर वार्ताही संगमनेरकरांना सहन कराव्या लागत आहे. मंगळवारी अवघा तालुका गणेश विसर्जनाच्या उत्साहात दंग असताना शहरातील माळीवाडा परिसरातील इसमाच्या रुपाने शहरातील बारावा तर तालुक्यातील सत्ताविसावा बळी गेला, या वेदनादायी वार्तेला बारातास उलटायच्या आंतच तालुक्यातील आणखी एका 62 वर्षीय इसमाच्या कोविड मृत्युची वार्ता धडकली असून सलग दुसर्‍या दिवशी आणखी एकाचा बळी गेल्याने संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


गेल्या काही दिवसांत संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविडचा प्रादुर्भाव होत आहे. दररोज नवनवीन भागातून रुग्ण समोर येण्यासोबतच ठराविक अंतराने त्यातून एखाद दुसर्‍या मृत्युचीही वार्ता समोर येत असल्याने संगमनेरकरांची अवस्था बिकट बनली आहे. गेल्या 26 ऑगस्टरोजी बाधित असल्याचे समोर आलेल्या व तेव्हापासूनच प्रकृती गंभीर असलेल्या शहरातील माळीवाडा परिसरातील 70 वर्षीय इसमाचा मंगळवारी सायंकाळी घोटी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला. या वार्तेने गणेशोत्सवाच्या समारोहाचा उत्साह विरघळला आणि संगमनेर शहरावर शोककळा पसरली. सदर इसमावर मंगळवारी रात्रीच वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.


हा धक्का पचवून संगमनेरकर आज आपल्या कामात मग्न असतांनाच आता पुन्हा एकदा तालुकावासीयांना दुसरा धक्का बसला असून समनापूर येथील 62 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. सदर इसमाची खासगी रुग्णालयातून आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती व 29 ऑगस्टरोजी त्यांना कोविडची बाधा झाल्याचेही समोर आले होते. त्या दरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने पुण्याला हलविण्यात आले होते. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. पुण्यात उपचार सुरु असतांना त्यांचा अखेर दुर्दैवी मृत्यु झाला. त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले.


सदरील 62 वर्षीय इसम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे माजी संचालक तर अनेक वर्ष समनापूरचे कामागर पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. सामाजिक क्षेत्रात नेहमी आघाडीवर असलेल्या या व्यक्तिने मानवसेवेला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या निधनाचे वृत्त समनापूरात पोहोचताच केवळ समनापूरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. सदर मृत्युबाबत माहिती मिळताच राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुरध्वनीवरुन मयताच्या कुटुंबियांचे सात्त्वन केले. आपण आज एका हुशार व कार्यतत्पर सहकार्‍याला मुकल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सदरच्या व्यक्तिचा मृत्यु ग्रामीणभागातील सोळावा तर संपूर्ण तालुक्यातील 28 वा मृत्यु ठरला आहे.

मंगळवारी सायंकाळी माळीवाड्यातील सत्तर वर्षीय ज्येष्ठ नारिकाच्या मृत्युसोबतच शहरासह तालुक्यातील 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अवघा तालुका शहारला होता, या धक्क्यातून बाहेर निघत असतांनाच कोविडने अवघ्या बारा तासांच्या आंतच दुसरे सावज टिपतांना समनापूर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकालाही आपल्या कवेत घेतल्याने समनापूरसह संपूर्ण तालुक्यातून शोक व्यक्त होत आहे. या मृत्युने संगमनेर तालुक्यातील कोविड बळींची संख्या 28 वर पोहोचवली आहे.

Visits: 117 Today: 1 Total: 1109401

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *