हैदराबादहून औषध मागवत ‘देवदूतां’नी वाचविले कोविड रुग्णाचे ‘प्राण’
हैदराबादहून औषध मागवत ‘देवदूतां’नी वाचविले कोविड रुग्णाचे ‘प्राण’
भेंडा येथील कोविड सेंटरच्या डॉक्टरांचे परिसरातून कौतुक; सहा रुग्णांनाही दिली उपचारांती सुट्टी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तात्काळ उपलब्ध होत नसलेले ‘रेमडेसीवीर’ औषध खास हैदराबादला गाडी पाठवून उपलब्ध करत एका कोविड रुग्णाचे प्राण वाचविण्याची किमया नेवासा तालुक्यातील भेंडा येथील कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी केली आहे. ‘देवदूतां’च्या या तत्परतेचे नातेवाईकांकडून कौतुक होत असून रुग्णालय सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सहा रुग्णांना यशस्वी उपचारांती सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे हे कोविड सेंटर परिसरातील बाधित रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
![]()
नेवासा तालुक्यातील कोविड रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून नेवासाफाटा येथील श्वास हॉस्पिटलचे प्रमुख तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अविनाश काळे यांनी तालुक्यातील पंचेचाळीस डॉक्टरांना एकत्रित करून शासकीय दरपत्रकानुसार कोविड सेंटर सुरू करण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर सर्व डॉक्टरांनी तालुक्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये आर्थिक हातभार देऊन कोविड सेंटर 14 सप्टेंबर रोजी सुरू केले आहे. या सेंटरचा शुभारंभ साध्या पद्धतीने केल्यानंतर तात्काळ काही बाधित रुग्ण दाखल झाले. प्राणवायूची व्यवस्था असलेल्या या रुग्णालयात डॉ.अविनाश काळे यांच्यासह सहयोगी डॉक्टरांनी विशेष प्रयत्न करून आठ दिवसांमध्ये सहा रुग्णांवर यशस्वी उपचार करत कोरोनामुक्त केले आहे.

भेंडा येथील नेवासा तालुका डॉक्टर्स कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये सोमवारी (ता.21) 28 व 25 वर्षीय युवक कोरोनामुक्त झाले. त्यानंतर मंगळवारी (ता.22) 35, 30, 19 वर्षीय युवक तर 65 वर्षीय वृद्ध कोरोनामुक्त झाले. तत्पर व काळजी घेऊन आरोग्य सेवा मिळाल्याची प्रतिक्रिया देत व मोठ्या आनंदात रुग्णांनी घराची वाट धरली. कोरोनामुक्त झालेल्या या सर्व रुग्णांवर उपस्थित डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करत निरोप दिला. तालुक्यातील डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने शासकीय दरपत्रकानुसार सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये उत्तम आरोग्य सेवा देऊन कोरोनामुक्त केल्याबद्दल नातेवाईकांनी डॉक्टरांच्या पथकाला मनापासून धन्यवाद दिले.

रुग्णांना तत्परतेने व काळजीपूर्वक आरोग्य सेवा देत असताना एका अतिजोखमीच्या रुग्णाला रेमडेसीवीर औषध मिळत नाही म्हणून खास गाडी करून हे औषध हैदराबाद येथून आणले. ते उपलब्ध झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या पथकाने त्या रुग्णाचे प्राण वाचवले याचे आम्हा सर्वांना सेवा देताना समाधान वाटले.
– डॉ.अविनाश काळे (हृदयरोग तज्ज्ञ)
