नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांना मोठी आघाडी! पहिल्या फेरीचा निकाल हाती; आघाडीच्या शुभांगी पाटील यांना निम्म्याहून कमी मते..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण राज्याला प्रतीक्षा लागून राहीलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघातून पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार बहुचर्चीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पहिल्याच फेरीच 8 हजारांहून अधिक मोठी आघाडी घेतली असून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निम्म्याहून कमी मते मिळाली आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार तांबे यांना 15 हजार 782 मते मिळाली असून तब्बल दोन हजारांहून अधिक मते बाद ठरली आहेत.

राज्यातील अन्य पदवीधर व शिक्षक मतदार संघाप्रमाणेच आज सकाळी नाशिक पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सुरु झाली. आत्तापर्यंत राज्यातील कोकण, नागपूर व अमरावती येथील जवळपास निर्णायक कल समोर आलेले असतांना संपूर्ण राज्याचे लख्य केंद्रीत झालेल्या नाशिकमधून मात्र कोणतेच वृत्त मिळत नसल्याने चलबिचल वाढली होती. त्यातच मतमोजणी केंद्रातील 16 व्या क्रमांकाच्या टेबलवर मोजणी अधिकारी व मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या समर्थकांमध्ये काहीसा गोंधळ उडाल्याने काहीवेळ मोजणीची प्रक्रिया बाधित झाली होती.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हस्तक्षेप करीत पोलिसांना पाचारण केल्यानंतर सदरचा प्रकार थांबला व त्यानंतर काही वेळातच अवघ्या राज्याचे लक्ष्य वेधणार्या नाशिक पदवीधर मतदार संघातील पहिला कल जाहीर झाला. त्यानुसार अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना 15 हजार 774 मते मिळाली असून त्यांनी पहिल्याच फेरीत 8 हजार 266 मतांची आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना तांबे यांच्यापेक्षा निम्मी मते मिळाली असून पहिल्या फेरीत त्यांनी 7 हजार 508 मते प्राप्त केली आहेत.

