शेतकर्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा जास्त लाभ घ्यावा ः डॉ. गडाख राहुरी कृषी विद्यापीठात तंत्रज्ञान दिवस व शिवार फेरीसह चर्चासत्र उत्साहात

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी कृषी विद्यापीठाने संशोधनामध्ये आत्तापर्यंत विविध पिकांचे 270 पेक्षा अधिक वाण, 1650 पेक्षा जास्त शिफारशी व 40 अवजारे संशोधित केली आहेत. आपली शेती तंत्रज्ञानयुक्त करण्यासाठी शेतकर्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्ताने ज्वारी सुधार प्रकल्प येथे रब्बी तंत्रज्ञान दिवस व शिवार फेरी आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गडाख बोलत होते. कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील व साहेबराव नवले, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक सुखदेव बलमे, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. हरी मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप उपस्थित होते.

विकास पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर तृणधान्ये व कडधान्यांचे उत्पादन वाढले पाहिजे असे शासनाचे धोरण आहे. शेतकर्यांनी केवळ आपले उत्पन्न व उत्पादकता न वाढविता आपल्या उत्पादनांचे मूल्यवर्धन करून एखादा ब्रँड तयार करून विक्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून केल्यास फायदा होईल. डॉ. प्रमोद रसाळ यांनी शेतकर्यांना शेतीमध्ये पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. शिवाजी जगताप यांनी महाराष्ट्रातील तृणधान्यांच्या लागवड क्षेत्राविषयीची माहिती दिली. यावेळी डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. सुरेश दोडके, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. दीपक दुधाडे व डॉ. सच्चिदानंद तांबे यांनी रब्बी पिकांविषयी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. विजू अमोलिक यांनी केले. शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी विलास नलगे, रवींद्र माने, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे उपस्थित होते.

39 पिकांची प्रात्यक्षिके..
पीक प्रात्यक्षिकांमध्ये रब्बी पिकांचे 10 वाण, भाजीपाला पिकांचे 16 वाण व हरभर्याचे 13 वाण अशा एकूण 39 विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकर्यांनी घेतला. या प्रात्यक्षिकांना शेतकर्यांनी आवर्जून भेटी दिल्या व विद्यापीठाचे तंत्रज्ञान जाणून घेतले.
