मृत्यूच्या भयातही संगमनेरातील कत्तलखाने ‘बिनधास्त’! संगमनेरातून टेम्पोत भरलेले एक टन गोवंशाचे मांस नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा धुडगूस सुरु आहे. रोज मोठ्या संख्येने समोर येणार्‍या रुग्णांसह ऑक्सिजनची खाट अथवा रेमडेसिवीर लस न मिळाल्याने जिल्ह्यात दररोज माणसं मरत असतांनाही अवैध धंदेवाईकांवर या परस्थितीचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. हे सिद्ध करणारी घटना नारायणगावमधील पशूप्रेमींनी समोर आणली असून संगमनेरातील कत्तलखान्यांमधून तब्बल एक टन गोवंशाचे मांस भरलेला टेम्पो नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. सदरचे वृत्त संगमनेरात कोविड संक्रमणातील मृत्यूच्या भयातही अवैध व्यावसायीकांचा ‘बिनधास्तपणा’ आणि पोलिसांचा नाकर्तेपणा स्पष्ट करणारे ठरले आहे.

याबाबत नारायणगाव पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी नारायणगाव येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती कळविली. त्यानुसार तेथील कार्यकर्त्यांनी सापळा लावून संगमनेरहून मुंबईच्या दिशेने निघालेला टेम्पो (क्र.एम.एच.14/जे.यू.9789) पुणे-नाशिक महामार्गावरुन नारायणगावात आल्यावर त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र तो थांबला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करुन त्याला वारुळवाडी (ता.खेड) येथे थांबण्यास भाग पाडले. यावेळी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात बर्फात दडवून ठेवलेले सुमारे एक टनांहून अधिक गोवंशाचे मांस आणि त्यांच्या अवयवांचे तुकडे आढळून आले.

या प्रकरणी चालकाकडे चौकशी केली असता सदरचे गोवंशाचे मांस आपण संगमनेर येथून आणले असून आपले मालक कमरअली (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्या सांगण्यावरुन आणले असून खेड (जि.पुणे) येथे घेवून जात असल्याचे सांगीतले. त्यावरुन नारायणगाव पोलिसांनी सदर वाहनाचा चालक मुशरीफ मोहंमद फकीर (वय 31, रा.उमदा प्लाझा, ता.जुन्नर) याला अटक केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी टेम्पोसह सुमोर एक टन गोवंशाचे मांस हस्तगत केले असून त्याची कायदेशीर पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. या प्रकरणी नारायणगाव येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते कृष्णा माने यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या कारवाईसाठी अनिकेत चिखले, सिद्धेश पडघम, गणेश थोरात, ऋषीकेश जंगम, पवन डेरे, हर्षद भास्कर व दर्पण पवार आदी गोसेवकांनी सहकार्य केले.

सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील कोविडस्थिती तर अत्यंत चिंताजनक अवस्थेत पोहोचली असून रुग्णांना ऑक्सिजन सुविधेच्या खाटा व रेमडेसिवीर लस मिळेनासी झाली आहे. संपूर्ण तालुक्यात कोविडच्या प्रचंड संक्रमणाने धुमाकूळ घातलेला असतांना सर्वसामान्य माणसं कोविडच्या दहशतीखाली वावरत आहेत. पंधरा दिवसांच्या संचारबंदी आदेशामुळे राज्यातील उद्योग, धंदे व व्यवसाय बंद आहेत. राज्य सरकारच्या आवाहनानुसार उद्योजक, व्यापारी, कर्मचारी व मजुरांनी सरकारला प्रतिसाद देत आपापले व्यवसाय बंद ठेवले आहेत. एकीकडे उपासमार सोसूनही सरकारचे आदेश पाळले जात असतांना दुसरीकडे मात्र या आदेशांची अवैध व्यावसायिकांकडून सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र संगमनेरात दिसत आहे.

वास्तविक शहरातील कत्तलखाने सुरु असल्याच्या वृत्ताचा शहर पोलिसांनी वेळोवेळी इन्कार केला आहे. मात्र त्याचवेळी संगमनेरातून शेकडों किलों गोवंशाचे मांस भरुन गेलेली वाहने अन्य जिल्ह्यात वा तालुक्यात पकडली जातात आणि त्यातून संगमनेरातील कत्तलखाने कोविडच्या संसर्गातील मृत्यूच्या भयातही ‘बिनधास्त’ सुरु असल्याचे सिद्ध करुन जातात. गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना असून यापूर्वी घोटी पोलिसांनीही संगमनेरातून खचाखच भरुन मुंबईच्या दिशेने सुसाट निघालेले वाहन पकडले होते, आता नारायणगाव पोलिसांनी कारवाई करीत संगमनेरातील कत्तलखाने ‘सुरुच’ असल्याच्या वृत्तावर विश्वासार्हतेची मोहोर उमटवली आहे.

संगमनेर शहर पोलीस आणि संगमनेरातील अवैध गोवंशाचे कत्तलखाने यांच्यातील स्नेह अवघ्या जिल्ह्याला परिचयाचा आहे. अशाच एका घटनेतून चक्क चार वर्षांपूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांना कुरण गावात जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र त्यानंतरही ना कुरणमधून संगमनेरातील कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा थांबला, ना संगमनेरातून कापलेल्या जनावरांचा मुंबई, पुणे, मालेगाव व गुलबर्ग्यात होणारा गोवंश मांसाचा पुरवठा थांबला. यावरुन पोलीस आणि संगमनेरातील कत्तलखाने यांच्यातील अतुट संबंध पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत.

Visits: 13 Today: 1 Total: 116838

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *