पर्यटकांसारखे येणार्या तळपाडेंनी वैयक्तिक बदनामी करू नये ः दराडे भ्रष्टाचारावरील आरोपांवर तत्काळ पत्रकार परिषद घेऊन दिले प्रत्युत्तर

नायक वृत्तसेवा, अकोले
समशेरपूर गटातील विकासकामांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. त्यात ग्रामसेवकावर कारवाईही झाली. भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे, भ्रष्टाचाराशी काही संबंध सिद्ध झाले तर प्रशासन जी सजा देईल ती भोगीन, असे सांगत निवडणूक आली की, पर्यटकांसारखे येणार्या मधुकर तळपाडेंनी वैयक्तिक बदनामी करू नये, अशी टीका माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी केली.

शिवसेना नेते मधुकर तळपाडे व तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर लगेच सायंकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य मारूती मेंगाळ उपस्थित होते. यावेळी दराडे म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून आपण रोखठोक राजकारण केले. व्यक्तीद्वेषाचे राजकारण कधीही केले नाही. चुकीच्या पद्धतीने वागणार्याला आपण नेहमी विरोध केला. आता मधुकर तळपाडेंना जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध लागले म्हणून ते गटात सक्रीय होऊन गावागावांत फिरत आहेत आणि ते निवडणूक झाली की, पर्यटकासारखे गायब होतात.

कोविड काळात लोक त्रस्त असताना, जनतेचे प्रश्न निर्माण झाले असताना ही लोक कुठे होती. त्याकाळात आपण पत्नी सुषमा दराडे यांच्याबरोबर गावागावांत जाऊन लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला. या लोकांकडे काहीही मुद्दे नसल्याने त्यांनी वैयक्तिक बदनामी करण्याचे षडयंत्र सुरु केले आहे. तळपाडे सगळ्या समाजात जातीवाद पेरण्याचे काम करत आहेत. त्यांनी मोठ्या पदावर काम करुनही त्यांना प्रशासकीय यंत्रणांचे काम समजले नाही ही शोकांतिका आहे. आपण म्हाळुंगी-पेढेवाडी रस्ता मार्गी लावला, सांगवी स्मशान घाट, मान्हेरे ते कळसूबाई रस्ता मार्गी लावला अशी अनेक कामे निधी आणून गटात केली. शासकीय यंत्रणेवर अंकुश ठेवून विकासकामे मार्गी लावलीत. मात्र त्यांना विकासकामाचे हेडही माहीत नाही. कोणता निधी कुठे द्यायचे हे माहीत नाही व गटातील गावागावांत लहान लहान मुलांना, तरूणांना भडकावण्याचे काम करत आहेत. तालुक्यातील जनतेला जातीवादात नेऊन लोकांचे आयुष्य बरबाद करू नका. जनतेसाठी काहीही न करता ‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही त्यांनी सभापतींवर बंदूक रोखलेली आहे. त्यांच्याकडे बंदूक आहे उद्या हे विनाकारण लोकांना गोळ्या घालतील.

तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणतात, मला त्यांनी निवडून आणले. खरेतर ज्यांना गावातील ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून आणता आला नाही ते काय मला निवडून आणणार. त्यांच्या भरवशावर आपण निवडणूक लढलो नाही व त्यांनी आपल्याला उमेदवारी दिलेली नाही. तालुकाप्रमुखाने मला निवडणुकीत मदत करण्याऐवजी पैसे मागण्याचा तगादा लावला होता. दुसरे नेते मुंबईला जाऊन बसले होते. जनतेची कामे केल्याने निवडून आलो. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष खूप चांगला आहे. मात्र इथला तालुकाप्रमुख व त्यांची चांडाळ चौकडी आहे. प्रारंभी पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य मारुती मेंगाळ यांनी स्वागत करून पत्रकार परिषदेचा विषय स्पष्ट केला.
