सामूदायिक विवाह सोहळ्यात सत्तावीस जोडप्यांचे शुभमंगल! मालपाणी उद्योग समूहाचा उपक्रम; नेटके नियोजन आणि शेकडोंच्या उपस्थितीत शाही सोहळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रवेशद्वारापासून प्रत्यक्ष विवाह समारंभाच्या मंचापर्यंत उत्कृष्ट सजावट, राजस्थानी स्थापत्यशैलीचा अविष्कार असलेला देखणा मंच, आलेल्या प्रत्येक पाहुणे मंडळीचे अगत्याने स्वागत, जवळपास दहा हजार पाहुणे मंडळींच्या भोजनाची नियोजनबद्ध व्यवस्था, पाहुण्यांसाठी संगीत मैफील अशी शाही सुसज्ज व्यवस्था असलेला मालपाणी उद्योग समूहाचा सामूदायिक विवाह सोहळा शनिवारी मोठ्या थाटात पार पडला. आमदार सत्यजीत तांबे, उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्यासह हजारो पाहुणे मंडळींच्या साक्षीने 24 हिंदू व तीन बौद्धधर्मीय जोडप्यांचे शुभमंगल झाले. गेल्या 26 वर्षांपासून मालपाणी उद्योग समूहाकडून या सोहळ्याचे आयोजन केले जाते.

दिवंगत उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी यांनी आपल्या सामाजिक दायित्त्वातून 1997 साली मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने संगमनेर तालुक्यातील सर्वधर्मीयांसाठी सामूदायिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू केली. गेल्या 26 वर्षांच्या कालावधीत या सोहळ्याच्या माध्यमातून साडेबाराशेहून अधिक जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या सोहळ्यात सहभागी होणार्या जोडप्याकडून अवघा एक रुपया नाममात्र शुल्क आकारला जातो. विवाह बंधनात अडकलेल्या दाम्पत्याला प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या संसारोपयोगी वस्तुही भेट म्हणून दिल्या जातात. याशिवाय दोन्ही बाजूच्या हजारो निमंत्रित मंडळींसाठी शाही भोजनाची व्यवस्था हे या विवाह सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरते.

या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी सामूदायिक विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे सांगताना आपला विवाह देखील अशाच सोहळ्यामध्ये झाल्याची आठवण करुन दिली. मालपाणी उद्योग समूहाकडून आयोजित होणारा सामूदायिक विवाह सोहळा सर्व धर्मीयांसाठी आदर्श उपक्रम असल्याचे ते म्हणाले. साधेपणाने लग्न समारंभ करण्याचा संदेश सर्वांनी मनावर घेतल्यास कर्जबाजारीपणातून होणार्या आत्महत्या थांबतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आर्थिकदृष्ट्या संपन्न असतानाही माहेश्वरी समाजाकडून विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अवांतर खर्च टाळण्यासाठी त्या समाजाने विशिष्ट नियम केले आहेत, त्याचे सर्वच समाजांनी अनुकरण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रास्ताविकात डॉ. संजय मालपाणी यांनी मालपाणी उद्योग समूहाच्या सामूदायिक विवाह सोहळ्यात मालपाणी परिवार वधू पित्याच्या भूमिकेत वावरत असल्याचे सांगितले. आजवर साडेबाराशेहून अधिक परिवारांना परस्परांशी जोडण्याची किमया या सोहळ्यातून साधल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्यांमध्ये तेरा विवाह हे आंतरजातीय असून त्यातील अनेकजण उच्चशिक्षित आहेत ही खूप समाधानाची गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या सोहळ्यात हिंदू धर्मियांसाठीचे विधी भाऊ जाखडी तर बौद्ध धर्मियांचे विधी बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे व त्यांच्या पत्नी प्रतिभा देठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरारी देशपांडे व राम पाटसकर यांनी तर गिरीश मालपाणी यांनी आभार मानले.

मालपाणी उद्योग समूहाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी खास राजस्थानी स्थापत्यशैलीचा वापर करुन आकर्षक मंच उभारण्यात आला होता. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून त्यावर विविध झाडाफुलांनी केलेली सजावट उपस्थित प्रत्येकाची लक्ष वेधणारी ठरली. हा सोहळा पार पडल्यानंतर प्रत्येक नवदाम्पत्याला 25 हजार रुपयांच्या संसारोपयोगी वस्तुंसह एक रोप आणि शिर्डी येथील वॉटरपार्क व थिमपार्कची तिकिटे भेट म्हणून देण्यात आली. या सोहळ्याला दहा हजारांहून अधिक पाहुणे मंडळी उपस्थित होती.
