कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची जीभ पुन्हा घसरली! परस्पर व्हिडिओ ‘अपलोड’ करणार्‍यांवर आगपाखड; मुलं दिव्यांग जन्माला येतील असा शाप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या अनोख्या शैलीचा वापर करुन अबालवृद्धांना कीर्तनाची गोडी लावणार्‍या संगमनेरनिवासी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. विदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या कीर्तनाचे व्हिडिओ परस्पर यू-ट्युब या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जात असल्याबद्दल आगपाखड केली. यावेळी त्यांनी आत्तापर्यंत चार हजारांहून अधिकजणांनी कोट्यावधी रुपये कमावल्याचा आरोपही केला. या प्रकारांमुळे आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा राग व्यक्त करतांना त्यांनी अशा प्रकारचे कृत्य करणार्‍यांची मुलं दिव्यांग म्हणून जन्माला येतील असा शापच देवून टाकला. त्यांचा हाच शब्द आता त्यांना पुन्हा एकदा अडचणीच्या दिशेने घेवून गेला आहे. यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर संगमनेरात ‘पीसीडीपीएनडी’ कायद्यान्वये गुन्हाही दाखल झाला होता, सत्र न्यायालयाने नंतर तो रद्द ठरवला.

अकोला (विदर्भ) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाचे अकोला शहरातील कौलखेड भागात आयोजन केले होते. यावेळी आपल्या मिश्कील शैलीत उपस्थितांना जगातील अप्रामाणिक तत्त्वांची उदाहरणे देत असतांना त्यांच्याच कीर्तनाचे व्हिडिओ कशा पद्धतीने परस्पर यू-ट्युबवर अपलोड करुन लोकं कोट्यावधी रुपये कमवित असल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्यात प्रकारात चार हजारांहून अधिक लोकांनी आपले मोठे आर्थिक नुकसान केल्याची आगपाखड व्यक्त करीत असतानाच त्यांची जीभ घसरली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘आपल्या कीर्तनाचे व्हिडिओ अपलोड करुन आत्तापर्यंत चार हजार लोकांनी यू-ट्युबवर कोट्यावधी रुपये कमावले आहेत. त्यांच्यामुळेच मी अडचणीत आलो आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप्स् यू-ट्युबवर टाकणार्‍यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील.’ असा संताप त्यांनी व्यक्त केला. आर्थिक नुकसानीच्या संतापातून त्यांनी हे वक्तव्य केले असले तरीही आता हेच वक्तव्य त्यांना अडचणीचे ठरण्याचीही शक्यता आहे.

यापूर्वी त्यांनी अपत्य प्राप्तीच्या बाबतीतही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. स्त्री सोबत समतीथीला संग झाल्यास मुलगा, तर विषम तीथीला झाल्यास मुलगी जन्माला येते असे सांगताना त्यांनी पुराणातील काही दाखलेही दिले होते. स्त्री सोबत अशीव वेळेत संग झाल्यास त्यातून जन्माला येणारी अपत्य बेवडी, रांगडी आणि खान्दान मातीत घालणारी असतात असं वादग्रस्त वक्त करतांना पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्री सोबत सूर्यास्तावेळी संग केल्याने त्यातून रावण, विभीषण व कुंभकर्ण जन्माला आले. तर आदिती नावाच्या ऋषींनी पवित्र दिवशी संग केल्याने त्यांच्या पोटी हिरण्यकक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हादाचा जन्म झाला अशा प्रकारचे दाखलेही त्यांनी आपल्या कीर्तनातून दिले होते.

त्यांच्या याच वक्तव्यावरुन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने रान उठवित त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. अखेर ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन अधीक्षक डॉ.भास्कर भवर यांनी संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात निवृत्ती महाराज देशमुख यांच्या विरोधात गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हाही दाखल केला होता. त्या विरोधात कीर्तनकार देशमुख यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले व गुन्हा रद्द करण्याची विनंती केली. दोन्ही बाजूने झालेला प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदरचा गुन्हा रद्द केला होता. त्यातून सावरत असतांना आता अकोल्यातील वक्तव्याने महाराजांचा रस्ता पुन्हा एकदा बिकट केला आहे.


इंदुरीकर महाराज यांनी अकोला (विदर्भ) येथे केलेले वक्तव्य रिअ‍ॅक्शन आहे. त्यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर अशाप्रकारे अपलोड करुन जर कोणी पैसे कमावत असेल तर तो फौजदारी अपराध आहे. मात्र कायद्याची भिती न बाळगता हजारो लोकं असे कृत्य बिनबोभाट करीत आहेत, आणि त्याची झळ थेट त्यांना बसत आहे. अशा स्थितीत त्यांनी केलेले वक्तव्य हे रिअ‍ॅक्शन म्हणूनच पाहीले जात असल्याने यातून त्यांच्यावर कोणती कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. असे कायदेविषयक क्षेत्रातील मंडळींचे म्हणणे आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 117716

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *