अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल कोविड मुक्तीच्या दिशेने! सरासरी रुग्णवाढ पन्नाशीत; चार तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दोन वर्षांपासून कोविड संक्रमणाच्या उच्चांकाचे चढ-उतार अनुभवणारा अहमदनगर जिल्हा आता कोविड मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करु लागला आहे. त्यामुळे येणार्या काही दिवसांत जिल्हा निर्बंधमुक्त होण्याच्याही आशा निर्माण झाल्या आहेत. गेल्या महिन्यापर्यंत जिल्ह्यात दररोज सरासरी चारशे रुग्ण आढळत होते. मात्र मागील सहा दिवसांत त्यात मोठी घट झाली असून आजच्या स्थितीत जिल्ह्यातील सरासरी रुग्णगती अवघ्या 49 रुग्णांवर आली आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात खालावली असून सध्या जिल्ह्यातील अवघ्या 426 जणांवर उपचार सुरु आहेत.
मार्च 2020 पासून जिल्ह्यात कोविड संक्रमणाला सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षांच्या संक्रमणाच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. गेल्यावर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यात उसळलेल्या कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेने तर जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या दोन महिन्यातच जिल्ह्यात दररोज हजारो रुग्ण समोर आले, तर शेकडो रुग्णांना आपले जीवही गमवावे लागले. या कालावधीत जिल्ह्यातील अपुर्या आरोग्य सुविधाही ठळकपणे समोर आल्या. रुग्णांची उपचारांसाठी खाट मिळविण्याची धडपड, ऑक्सिजनचा तुटवडा अशी भयानक दृष्य दाखवणारी ही लाट अतिशय वेदनादायी ठरली.
हा अनुभव लक्षात घेवून चालू वर्षातील फेब्रुवारीनंतर संक्रमणाची तिसरी लाट येईल असे अंदाज गृहीत धरुन शासन व प्रशासनाने दुसर्या लाटेत राहीलेल्या कमतरता पूर्ण करीत जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी ऑक्सिजनचे प्रकल्प उभारुन जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबीही झाला होता. या कालावधीत प्रशासनाने विशेष मोहीमा राबवून लसिकरणालाही वेग दिला. त्यातच आलेल्या तिसर्या लाटेने जानेवारीच्या दुसर्या आठवड्यापासूनच रुग्णसंख्या फुगवण्यास सुरुवात केली. या एकाच महिन्यात जिल्ह्यात सरासरी 773 रुग्ण या गतीने तब्बल 23 हजार 953 रुग्ण आढळले, तर फेबु्रवारीत सुरुवातीच्या उच्चांकानंतर घसरत गेलेल्या रुग्णसंख्येने महिना संपतासंपता सरासरी 391 च्या गतीने 10 हजार 957 चा आकडा गाठला.
मात्र शासन व प्रशासनाने दुसर्या लाटेच्या धर्तीवर उभारलेल्या आरोग्य यंत्रणांचा या कालावधीत फारसा उपयोग झाला नाही. यामागे लसीकरण आणि नागरिकांच्या शरीरात निर्माण झालेली प्रतिपिंडे कारणीभूत मानली गेली. या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रत्यक्षात समोर आलेल्या रुग्णांपेक्षा समोर न आलेल्या अर्थात कोविड चाचणी न केलेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय होती. तिसरी लाट अनपेक्षितपणे सौम्य ठरल्याने त्याचेच हे परिणाम असल्याचेही त्यातून समोर आले. फेब्रुवारीच्या मध्यात त्यातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पहिल्या व दुसर्या संक्रमणाच्या तुलनेत जिल्ह्याला फारसा फटका बसला नाही.
आता तिसर्या संक्रमणाची गतीही जवळपास ओसरली असून राज्य सरकारने राज्यातील चौदा जिल्ह्यातील निर्बंध पूर्णतः मागे घेतले आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेगही सध्या नियंत्रणात आहे, मात्र जिल्ह्यात लसिकरणाची आकडेवारी मात्र शासनाच्या निकषांपेक्षा कमी असल्याने जिल्हा कोविड मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असतांनाही निर्बंधांचा सामना करीत आहे. आता रोजच्या रुग्णवाढीतही कमालीची घट होवू लागल्याने जिल्ह्याचा प्रवास कोविड रुग्णसंख्या शून्य होण्याच्या दिशेने सुरु झाला असून आज जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव, जामखेड व कर्जत तालुक्यातून एकही रुग्ण आढळलेला नाही. जामखेडमध्ये तर गेल्या तीन दिवसांत व कोपरगाव, कर्जतमध्ये सलग दुसर्या दिवशी एकही रुग्ण आढळलेला नाही.
तर संगमनेरसह पारनेर, श्रीरामपूर, पाथर्डी, राहुरी व नेवासा या सहा तालुक्यातील सरासरी रुग्णवाढीलाही मोठा ब्रेक लागला असून आज या तालुक्यांमधून प्रत्येकी अवघा एकच रुग्ण समोर आला आहे. गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यात सरासरी 49 रुग्णगतीने 341 रुग्ण आढळले. यात महापालिका क्षेत्रात सर्वाधीक 96, राहाता तालुक्यात 41, अकोले व कोपरगाव तालुक्यात प्रत्येकी 33 तर नगर तालुक्यातून 32 रुग्ण समोर आले आहेत. मागील सहा दिवसांत संगमनेर तालुक्यात अवघे आठ रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 94 हजार 226 जणांना कोविडचे संक्रमण झाले. त्यातून 7 हजार 223 नागरीकांना आपले जीव गमवावे लागले. सध्या जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही पाचशेच्या आंत असून आजच्या स्थितीत जिल्ह्यात केवळ 426 रुग्ण सक्रीय आहेत.
जिल्ह्यात आज अवघे 36 रुग्ण..
ओसरत असलेल्या तिसर्या लाटेच्या प्रभावात आज जिल्ह्यातून अवघे 36 रुग्ण समोर आले. त्यात सर्वाधिक अकोले 9, नगर तालुका 8, श्रीगोंदा 5, अहमदनगर महापालिका क्षेत्र 4, शेवगाव दोन, संगमनेर, नेवासा, पारनेर, श्रीरामपूर, पाथर्डी व राहुरीतून प्रत्येकी एक तर राहाता, कोपरगाव, जामखेड व कर्जत तालुक्यातून आज एकही रुग्ण समोर आलेला नाही. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 3 लाख 94 हजार 226 झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या अवघी 426 आहे.