किराणा माल चोरीप्रकरणी दोघांना पकडले राहाता पोलिसांची कामगिरी; चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नायक वृत्तसेवा, राहाता
शहरातील भरलोकवस्तीत असलेल्या आर. के. ट्रेडिंग या किराणा दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून 1 लाख 87 हजार रुपये किराणा साहित्याची धाडसी चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व राहाता पोलिसांनी संयुक्त तपास करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या खाद्यतेलाच्या डब्यांपैकी सुमारे 40 हजार 200 रुपये किंमतीचे तेलाचे 20 डबे मुद्देमाल व किराणा साहित्य चोरून नेण्यासाठी वापरलेली चारचाकी ओमनी गाडी हस्तगत केली आहे.
या घटनेतील चोरट्यांची नावे निष्पन्न झाले असून यातील आरोपी नीलेश दिलीप जाधव व भावड्या उर्फ राजेश सुभाष शाख दोघे (रा. राहाता) यांना पोलिसांनी अटक केली. तर दोन आरोपी पसार असल्याची माहिती राहाता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. शहरातील शनिचौकालगत भरवस्तीत असलेले आर. के. ट्रेडिंग होलसेल व किरकोळ किराणा विक्रीचे दुकान तसेच गोडाऊनमधून 16 सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी छताचे पत्रे उचकटून धाडसी चोरी केली होती. यामध्ये रोख चिल्लर तसेच गोडतेलाचे डबे, गोडतेलाचे बॉक्स, काजू व बदाम तसेच किराणा साहित्य चोरून नेले होते. सुमारे 1 लाख 87 हजार रुपये किंमतीचा किराणा माल अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास चोरून पोबारा केला होता. त्यानंतर दुकान मालक विरेश रुणवाल यांनी राहाता पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यावरुन भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
पोलिसांनी या घटनेप्रकरणी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर संबंधित आरोपीला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने या चोरीबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांना चोरीचा तपास करणे अधिक सोपे गेले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गावडे, पोलीस नाईक संतोष लोंढे, पोलीस नाईक भीमराज खरसे, पोलीस नाईक दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड तसेच राहात्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप तुपे, पोलीस नाईक सतीश आवारे यांनी संयुक्तिक तपास करून या चोरीतील एक आरोपीस राहाता शहरात गुरुवारी (ता.22) सापळा रचून अटक केले. आरोपीकडून चोरीस गेलेल्या मालापैकी खाद्यतेलाचे 15 लिटरचे वीस डबे सुमारे चाळीस हजार दोनशे रुपये किंमतीचा हा मुद्देमाल व चोरीत वापरण्यात आलेली चारचाकी गाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे. चोरीनंतर अवघ्या सहा दिवसांतच पोलिसांनी चोरीचा तपास करून काही मुद्देमाल हस्तगत केला. तसेच पोलिसांनी अवघ्या सात दिवसांतच या चोरीचा तपास लावून आरोपीस जेरबंद केल्याने नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.