अरे देवा! चोरट्यांनी पुन्हा शासकीय गोदाम फोडले! यावेळी ‘फक्त’ बॅटरीच नेली; पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरातील नागरीक आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आल्याचे वाटत असताना आता त्यात शासकीय कार्यालयांचाही समावेश झाला आहे. कधी नव्हे इतक्या ढासळलेल्या या स्थितीचा पूर्ण फायदा घेत चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच आव्हान देत बुधवारी पहाटे फोडलेल्या शासकीय गोदामात सलग दुसर्‍या दिवशीही चोरी करुन दाखवली. या घटनेने संगमनेर शहर पोलिसांची निष्क्रियताही चव्हाट्यावर आली असून हप्तेखोरीत व्यस्त असलेली यंत्रणा कर्तव्याकडे लक्ष देणार आहे की नाही असा संतप्त सवाल आता विचारला जावू लागला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.१८) पहाटे पुरवठा विभागाच्या गुंजाळवाडी शिवारातील गोदामात शिरकाव करीत चोरट्यांनी कार्यालयाचा दरवाजा तोडून आंत प्रवेश केला होता. या पहिल्या घटनेत चोरट्यांनी सहा हजार रुपयांच्या दोन सरकारी तात्रपत्र्या चोरुन नेल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून काहीतरी हालचाल होईल व किमान चोरट्यांना त्यांचे अस्तित्व दृष्टीस पडून वाढत्या चोरीच्या प्रकारांना काहीअंशी आळा बसेल असेच सामान्यांना अपेक्षीत होते, मात्र घडले उलटच.

बुधवारी चोरट्यांनी ज्या शासकीय गोदामाला लक्ष केले, त्याच गोदामात आज पहाटेच्या सुमारास सलग दुसर्‍यांदा चोरीची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी बुधवारप्रमाणेच गोदामाच्या आवारात असलेले पुरवठा विभागाचे कार्यालय फोडून आंत प्रवेश केला. यावेळी मात्र त्यांनी फारशी उचकापाचक न करता दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या इन्व्हर्टरची बॅटरी घेवून तेथून पळ काढला. या दरम्यान चोरट्यांनी कार्यालयातील कपाटं अथवा टेबलच्या ड्राव्हरला हातही लावला नाही आणि अन्य कशाचीही उचकापाचकही केली नाही.

यावरुन आदल्या दिवशी या गोदामात चोरी करणारे चोरटे एकच असल्याचेही स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या पुरवठा विभागातील अधिकार्‍याची स्वतंत्र तक्रार दाखल करुन घेण्याऐवजी पोलिसांनी चोरट्यांनी फाडलेली आपली लक्तरे वाचवताना स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यास नकार देत चक्क बुधवारी (ता.१८) दाखल झालेल्या चोरीच्या घटनेतच गुरुवारी (ता.१९) झालेल्या चोरीची घटना एक दिवस आधीच घुसवली असून त्यासाठी केवळ तक्रारदाराचा पुरवणी जवाब नोंदविण्यात आला आहे. यावरुन शहर पोलिसांची खालावलेली कामगिरी आणि निष्क्रियताही अधोरेखीत झाली असून नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.

Visits: 18 Today: 2 Total: 115301

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *