संकटालाही ‘संधी’ मानणारी दिव्यांग महिला! कोविडने डबघाईला आलेल्या पतीच्या व्यवसायाला दिली उभारी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यशस्वी पुरुषांमागे एक स्त्री असते; या पुरुषप्रधान संस्कृतितल्या वाक्याला मागे सारीत आजच्या एकविसाव्या शतकातील स्त्रीने आता पुरुषांनाही ‘ओव्हर टेक’ केल्याची जगात असंख्य उदाहरणे आहेत. आपणही पुढे जायचे.. या जिद्दीने, चिकाटीने आत्मनिर्भर होण्यासाठी आजची स्त्री धडपडते आहे, व्यवसायात पाय रोवून उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे, आपल्यातील कलाकौशल्यांना तिने बळ दिले आहे. आजच्या युगातील स्त्री व्यावसायिकही आहे आणि इतर महिलांच्या हातांना ती कामही देत आहे. संगमनेरातही अशाच प्रकारे धडपडणार्या, संघर्षातून मार्ग गवसणार्या आणि आपल्या कुटुंबाला यशाच्या मार्गावर नेणार्या अनेक कर्तृत्त्ववान महिला आहेत. त्यातील एक नाव म्हणजे मीना पुरुषोत्तम जोशी.

दिव्यांग असलेल्या या महिलेने आपल्या शारीरिक व्याधीला जीवन प्रवासात कधीही अडथळा होवू दिले नाही. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मीना जोशी यांनी शिक्षण हाच यशाचा मार्ग मानून प्रतिकूल परिस्थितीतही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर दिव्यांग असलेल्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मोठे परिश्रम घेतले आणि आपल्या सासरचा पारंपरिक व्यवसाय अधिक जोमाने फुलविला. मुळी संकटं नसतातच, तर त्या संकटात दडलेली एक संधीच असते असं त्या जेव्हा सांगतात तेव्हा खरोखरी मरगळलेल्या मनातही ऊर्जा प्रज्ज्वलित होते.
पुरुषोत्तम जोशी म्हणजे संगमनेरच्या खाद्य संस्कृतीत सर्व परिचित असलेले नाव आहे. आपल्या तीन पिढ्यांचा व्यावसायिक वारसा पुढे नेतांना त्यांनी महाराजा केटरर्स (आचारी) या फर्मच्या माध्यमातून या व्यवसायात चांगला जम बसविला आहे. जोशी महाराजही जन्मतः दिव्यांग आहेत, मात्र त्यांनीही त्याचा कधीही न्यून बाळगला नाही. त्यामुळेच गेल्या अडीच-तीन दशकांत त्यांनी मोठ्या परिश्रमाने आपला व्यवसाय नावारुपाला आणला. सगळंकाही व्यवस्थीत होतंय असे चित्र निर्माण होत असतांनाच सन 2020 च्या सुरुवातीला जगात कोविड नावाचे भय निर्माण झाले. त्यातून सगळ्यात मोठे नुकसान झालेल्या घटकांत केटरींग हा एक व्यवसाय आहे.

असंघटित असलेल्या या व्यावसायिक क्षेत्रात काम करणार्या कुशल व अकुशल कामगारांना कोविडच्या या भयानक संकटाने अक्षरशः रस्त्यावर आणले. पुरुषोत्तम जोशीही त्याला अपवाद ठरले नाहीत, मात्र या संकटातही त्यांची पत्नी मीना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली. विवाह समारंभांसह अन्य सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने जोशी महाराजांच्या हाताला कामच राहीले नाही. पर्यायाने त्याचा परिणाम त्यांच्याकडे काम करणार्या डझनभर कामगारांवरही झाला. त्यांची उपासमार या दिव्यांग दाम्पत्याला अस्वस्थ करणारी ठरली. त्यामुळे त्यांनी या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतांना त्यांना थोडीफार रोकड आणि घरातील किराणा माल देवून त्यांना संघर्ष सुरु ठेवण्याची प्रेरणा दिली.

स्वयंपाकाची कामे बंद झाली म्हणून थांबता येणार नाही, त्यासाठी पर्याय शोधावाच लागेल हा ध्यास घेवून मीना जोशी यांनी घरातच वेगवेगळी व्यंजने तयार करुन ती केवळ ‘पार्सल’ स्वरुपात विकण्याची कल्पना मांडली. लॉकडाऊननंतरच्या कालावधीत शासनाकडूनही पार्सल स्वरुपात खाद्यान्न विकण्यास मुभा असल्याने या दाम्पत्याने आपल्या पारंपरिक केटरींगच्या व्यवसायाला पुरक असलेला हा व्यवसाय सुरु केला आणि आठवड्यातील दोन दिवस संगमनेरकरांसाठी विविध स्वादीष्ट व्यंजने तयार करण्यास सुरुवात केली. कचोरी, कोथिंबीर वडा, बटाटेवाडा, दहीवडा, दालवडा, मिरचीवडा, दाळबट्टी अशा वेगवेगळ्या पदार्थ्यांच्या श्रृंखलेने अगदी सुरुवातीपासूनच संगमनेरकरांना त्यांनी आपल्याकडे आकर्षित केले.

मागील दोन वर्षांपासून देशात कोविडचा प्रभाव कायम आहे. या कालावधीत अनेक शिक्षीत, उच्चशिक्षीत, कुशल व अकुशल अशा सगळ्याच क्षेत्रातील अनेकांचे रोजगार गेले, यात पुरुषोत्तम जोशी यांचाही समावेश होता. मात्र त्यांच्या पत्नीने अचानक उभ्या राहिलेल्या या संकटालाही संधी मानून योग्यवेळी योग्य पर्याय निवडल्याने कोविडच्या महाभयानक कालावधीत या दिव्यांग दाम्पत्याने केवळ आपल्या कुटुंबालाच नव्हेतर आपल्याकडे काम करणार्या अशिक्षित कामगारांच्या हातांनाही काम दिले, संकटाच्या काळात आपल्या भाकरीतील अर्धी भाकरी त्यांच्या ताटात घालून त्यांनाही परिस्थितीशी लढण्याचे बळ दिले. कोणाच्या हाती नसलेल्या या महामारीच्या प्रादुर्भावाने एकीकडे अनेकांवर उपासमारीची वेळ आणली, मात्र दिव्यांग असतानाही केवळ आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मीना पुरुषोत्तम जोशी यांनी या संकटावर केवळ मातच केली नाहीतर या क्षेत्रात काम करणार्या अनेकांना प्रेरणाही दिली. त्यांच्या या पर्यायाने आर्थिक संकटाच्या दारात उभे असलेले त्यांचे पती जोमाने कार्यरत राहिले आणि त्यांच्या कुटुंबाचा गाडाही सुरळीतपणे सुरु राहिला. आजच्या महिला दिनी त्यांच्या संषर्घाचा आढावा अनेक महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

कोविडच्या काळात आमचा पारंपरिक केटरींगचा व्यवसाय अडचणीत आला. या व्यवसायात काम करणारी बहुतेक मंडळी अशिक्षित आहे, त्यामुळे कोविडचा मोठा फटकाही या व्यवसायालाच बसला. आमच्या महाराजा केटरर्स या फर्मवर अवलंबून असलेले डझनभर लोकं आहेत. त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला होता. मात्र स्वयंपाकाची कामे बंद झाली म्हणून काय झालं, त्याला पुरक असलेली अन्य कामे केली तरीही त्यातून अर्थाजन होवू शकते या विचाराने आम्ही घरातूनच विविध व्यंजने तयार करुन विक्री करण्यास सुरुवात केली आणि गेल्या दोन वर्षांच्या कोविड काळात आमचा हा नवीन व्यवसाय नावारुपाला आला. संकट पाहून घाबरुन न जाता त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला तर हमखास यश मिळते हा माझा स्वतःचा अनुभव यातून सिद्ध झाला.
– मीना पुरुषोत्तम जोशी
संचालिका : महाराजा केटरर्स
