गांजा विकणार्यांकडून सरपंचालाच ‘यशोधन’चा दम! मालुंजेच्या सरपंचांना गावातील सहा जणांकडून बेदम मारहाण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गावात गांजा का विकतो अशी केवळ विचारणा केल्याने राग अनावर झालेल्या इसमाने आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांना बोलावून घेत चक्क मालुंजाच्या सरपंचांनाच लाठ्या, काठ्या, लोखंडी टामी आणि कुर्हाडीसारख्या प्राणघातक शस्त्रांनी बेदम मारहाण करण्याची घटना मंगळवारी घडली. यावेळी आरोपीने तुला काय करायचे ते कर, आमच्या पाठीशी यशोधन असल्याची वल्गनाही केली होती. अर्थात हा सगळा प्रकार केवळ सरपंचावर धाक निर्माण करण्यासाठीच केला गेल्याचेही नंतर उघड झाले आहे. या घटनेत मालुंजाचे सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या जवाबावरुन तालुका पोलिसांनी सहा जणांविरोधात हत्येच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी (ता.4) सकाळी दहाच्या सुमारास तालुक्यातील मालुंजे येथे घडली. तेथील सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे (वय 39) हे गावातील नागरिकांच्या भेटी घेत असताना गावात राहणारा संजय लहानू बुरकुल त्यांना दिसला. यावेळी त्यांनी ‘अरे तू गावात गांजा का विकतो? त्यामुळे आपल्याच गावातील लोकं व्यसनाधीन होताहेत’ असे सांगितल्याने त्याचा पारा चढला आणि त्याने गलीच्छ शब्दांत सरपंचांना शिवीगाळ सुरु केली.
एवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही, तर त्याने फोन करुन आपल्या कुटुंबातील मारुती अनाजी बुरकुल, स्वप्नील मारुती बुरकुल, रोहिदास लहानू बुरकुल, लहानू कोंडाजी बुरकुल व गणेश भाऊसाहेब डोंगरे यांना बोलावून घेतले. ही सर्व मंडळी घटनास्थळी जाताना लाठ्या, काठ्या, लोखंडी टामी व कुर्हाडीसारखी जीवघेणी हत्यारे घेवून गेली व तेथे जाताच त्यांनी सरपंच घुगे यांना घेरुन बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान मुख्य आरोपी संजय बुरकुल याने ‘तुला काय करायचे, कोणाकडे तक्रार करायची ते कर, आमच्या पाठिशी यशोधन आहे.’ असे सांगत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार सुरू असताना गावातील काही लोकांनी मध्यस्थी करीत वाद सोडविले व गंभीर जखमी झालेल्या सरपंचांना खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर तालुका पोलिसांनी रुग्णालयात जावून सरपंच संदीप घुगे यांचा जवाब नोंदविला. त्यानुसार पोलिसांनी वरील सहा जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 143, 147, 148, 149, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. या घटनेने मालुंजातील बेकायदा धंद्यांच्या विषय ऐरणीवर आला असून त्यातून गावातील गुंडगिरी वाढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणीही पुढे आली आहे.
बेकायदा उद्योग करताना अधिकारी, नेते अथवा राजकीय पक्षांशी आपली जवळीक असल्याचे भासविण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. मंगळवारी मालुंजातील प्रकारही याच कडीतील असून या घटनेतील आरोपीने चक्क महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाचे आपणास पाठबळ असल्याची वल्गना केली होती. प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीने सरपंचांवर धाक निर्माण करण्यासाठी व पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ‘यशोधन’ नावाचा वापर केल्याचे समोर आले आहे.