‘समृद्धी’च्या शेजारील नवनगरला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध कोपरगावसह वैजापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचे साखळी उपोषण

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या शेजारी नव्याने उभारल्या जाणार्‍या नवनगरला शेतकर्‍यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद सीमेवरील अनेक गावांमधील सुमारे साडेपाच हजार एकर जमीन यासाठी संपादित होणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

नागपूर-मुंबई या साधारण 700 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नागपूरपासून ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील रस्ता खुला होणार आहे. या महामार्गाच्या बाजूला अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कृषी समृद्धी केंद्र बनवली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण प्रस्तावित आहे. मात्र औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील गावातील शेतकर्‍यांनी या प्रकल्पाला जमिनी देण्यास विरोध केला आहे.

गेल्या 60 दिवसांपासून कोपरगाव आणि वैजापूर तालुक्यातील शेतकरी साखळी उपोषण करत आहेत. मात्र सरकारने याची कोणतीही दखल न घेतल्याने गुरुवारी या परिसरातील चार गावातील शेकडो शेतकर्‍यांनी समृद्धी महामार्गावरच धरणे आंदोलन केलं. शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकरी आपल्या कुटुंब तसंच ट्रॅक्टरसह समृद्धी महामार्गावर एकवटले आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने करत धरणे आंदोलन करण्यात आले. अगोदरच समृद्धी महामार्गासाठी धोत्रे गावची जमीन गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता या नव्याने होणार्‍या नवनगरसाठी धोत्रे, पुरणगाव, लाखगंगा, बाबतरा या गावांमधील जमीन नवनगरसाठी गेल्यास 10 हजार शेतकरी भूमीहीन होणार आहेत. सरकारने हा प्रकल्प बागायती क्षेत्रात न उभारता जिरायची भागात उभारावा आणि आमचे शेतीचे गट नंबर या प्रकल्पातून वगळावे, अन्यथा आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शेतकर्‍यांनी दिला आहे. दरम्यान, वैजापूरच्या प्रांत अधिकार्‍यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार राहुल गायकवाड यांनी या आंदोलनाला भेट दिली. शेतकर्‍यांची लेखी संमती असल्याशिवाय जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असं प्रांताधिकार्‍यांचं लेखी पत्र असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या प्रकल्पातून गट नंबर वगळले नाही तर तीव्र आंदोलनाच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.

Visits: 88 Today: 1 Total: 1114726

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *