चांदा येथील कर्डिले वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ तिघांना जबर मारहाण करीत मोठा ऐवज लुटून नेला

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील चांदा येथील कर्डिले वस्तीवर महाशिवरात्रीच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी अक्षरशः धिंगाणा घालून दहशत निर्माण केली. वस्तीवरील लोकांना प्रचंड मारहाण करत मोठा ऐवज चोरून नेला आहे. तसेच चोरट्यांशी झालेल्या झटापटीत तिघे जबर जखमी झाले असून त्यातील ओंकार गंगाधर कर्डिले हा युवक गंभीर जखमी असल्याचे समजते. इतर दोघांनाही मोठ्या दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींना गावातील खासगी रुग्णालयात दाखल करुन तेथे प्राथमिक उपचार करून सर्वांना अहमदनगर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

चांदा-लोहारवाडी रस्त्यावरील कर्डिले वस्ती येथे महाशिवरात्रीच्या रात्री साधारण 12 ते 1 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बापू भाऊसाहेब कर्डिले यांच्या वस्तीत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अर्चना कर्डिले व आई नर्मदा कर्डिले यांना दमदाटी करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवून नेले. यावेळी बापू कर्डिले व त्यांचे चुलते गंगाधर नामदेव कर्डिले, सुभाष नामदेव कर्डिले आदी कर्डिले वस्तीवरील लोक जागे होऊन त्यांच्या पाठीमागे पळाली. शेजारीच कांद्याच्या शेतात त्यांनी एकाला पकडले. मात्र पाठीमागून अंधारात लपून बसलेल्या दुसर्याने पळत येऊन त्यातील तिघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आपली लोक जखमी झाल्याचे पाहून कर्डिले वस्तीवरील लोकांनी चोरट्याला सोडून जखमींना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

या घटनेची खबर समजताच सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास श्वान पथकही आले होते. बुधवारी सकाळी 9 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरीचा तपास लवकर लावला जाईल असे उपस्थितांना सांगितले.
