कंपनीच्या आवारात घुसून तिघांचा अधिकार्यांवर हल्ला सुरक्षारक्षकांनाही धक्काबुक्की; रासायनिक फवार्याने दोघे जखमी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कंपनीच्या आवारात घुसून विनाकारण अधिकार्यांशी हुज्जत घालीत त्यांच्यावर रासायनिक द्रवाचा फवारा मारुन दोघांना इजा पोहोचविल्याप्रकरणी कासावाडीतील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार गेल्या रविवारी सायंकाळी मालपाणी उद्योग समूहाच्या अकोले रस्त्यावरील कारखान्यात घडला. या घटनेने कारखान्याच्या परिसरात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता, मात्र कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच धाव घेत गोंधळी इसमांना प्रवेशद्वाराबाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार रविवारी (ता.27) सायंकाळी सहाच्या सुमारास अकोले रस्त्यावरील उड्डाणपुलानजीकच्या मालपाणी इस्टेट येथे हा प्रकार घडला. कासारवाडीत राहणारे सागर वाळके, अशोक काळे व बंटी पंचारिया हे तिघे या कारखान्याच्या प्रवेशद्वारावर येवून गोंधळ घालीत होते. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना विचारणा केली असता त्या तिघांनीही अरेरावी करीत अधिकार्यांना प्रवेशद्वारावर बोलावण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित सुरक्षारक्षकांनी कारखान्याच्या व्यवस्थापकांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी तिघांनाही चर्चेसाठी कार्यालयात बोलावले.

यावेळी कंपनीचे अधिकारी देवदत्त सोमवंशी व रवींद्र कानडे हे दोघे त्या तिघांशी चर्चा करीत असतांना त्यांनी अचानक आरडाओरड करीत तुमच्या कारखान्यातून येणार्या वासाने आम्हाला त्रास होत असल्याचे सांगू लागले. त्यावर संबंधित अधिकार्यांनी कारखान्यातील वास बाहेर जावू नये अथवा हवेत त्याचे कण उडू नयेत यासाठी कंपनीकडून राबविल्या जात असलेल्या आधुनिक उपायांची त्यांना माहिती देण्यास सुरुवात केली. कारखान्यातील स्वच्छता, धुळ हवेत उडणार नाही यासाठीची यंत्रणा याबाबत त्यांच्यात चर्चा सुरु असतांना त्यांनी अचानक आरडाओरड करीत त्या दोन्ही अधिकार्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

या गदारोळात बंटी पंचारिया याने आपल्या खिशातून काहीतरी वस्तू काढीत त्याचा फवारा त्या दोघांच्याही तोंडावर मारला. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची व चेहर्याची आगआग होवू लागल्याने ते मोठ्याने ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून कंपनीचे सुरक्षारक्षक दत्तू काळे तेथे पोहोचले व त्यांनी त्या तिघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यालाही दमबाजी करीत धक्काबुक्की करीत तेथून पळ काढला. यानंतर त्या दोन्ही अधिकार्यांना अन्य कर्मचार्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेवून त्यांच्यावर उपचार केले. या प्रकरणी देवदत्त सोमवंशी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कासारवाडीतील सागर वाळके, अशोक काळे व बंटी पंचारिया या तिघांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. यातील बंटी पंचारिया याच्यावर यापूर्वीही शहर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
