राहुरी खुर्दमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात संसाराची राखरांगोळी सुदैवाने घरातील व्यक्ती तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचार्यांच्या श्री दत्त वसाहतीमध्ये एका घरात शनिवारी (ता.2) पहाटे साडेचार वाजता गॅस सिलेंडरचा (टाकी) स्फोट झाला. मात्र, सुदैवाने घरातील व्यक्ती तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. परंतु, पसरलेल्या अग्नितांडवात एका नवीन दुचाकीसह घरातील चारही खोल्यांमधील लाखो रुपयांच्या वस्तू, कपडे, किराणा, अन्नधान्य, महत्त्वाची कागदपत्रे व इतर सामानांची अक्षरशः राखरांगोळी झाली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राहुरी खुर्द येथील अशोक आत्माराम पाटील यांच्या घरात सिलेंडरचा (टाकी) स्फोट झाल्याने अग्नितांडव घडले. ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभागात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. घरासमोरील श्री दत्त मंदिरात दैनंदिन पूजेसाठी पहाटे सव्वाचार वाजता पाटील घराबाहेर पडले. त्यांच्या पत्नी नुकत्याच झोपेतून उठल्या होत्या. घरात दोन मुलगे, एक भाचा, एक भाची झोपलेले होते. एका खोलीत सीलबंद असलेले गॅस सिलेंडर ठेवले होते. तेथे अचानक अग्नितांडव सुरू झाले. घरातील सर्वजण तात्काळ बाहेर धावले.
दरम्यान, गॅस सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाला. यामुळे श्री दत्त मंदिरात गेलेले पाटील यांनी स्फोटाचा आवाज ऐकून घराकडे धाव घेतली. तोपर्यंत चारही खोल्यांमध्ये आग पसरली. घरातील अंथरून-पांघरून, कपडे, स्टीलची दोन कपाटे, एक फ्रीज, अन्नधान्य, किराणा सामान, घरगुती वापरण्याच्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीने रौद्ररूप धारण केले. सिलेंडरच्या स्फोटाने घराचे दरवाजे, खिडक्या, तावदाने फुटली. सहा महिन्यांपूर्वी नवीन घेतलेली एक दुचाकी आगीत भस्मसात झाली. शेजारील कुटुंबांनी घरातील साठवण टाकीतील पाणी बादल्यांनी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. महावितरण कंपनीने तात्काळ वीज पुरवठा खंडीत केला. देवळाली प्रवरा पालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.
वीजेच्या शॉर्टसर्किटची शक्यता…
श्री दत्त वसाहत कृषी विद्यापीठाने चाळीस वर्षापूर्वी बांधलेली आहे. त्यावेळचे घरातील वायरिंग जीर्ण व खराब झालेले आहेत. गॅसचे सिलेंडर ठेवलेल्या खोलीत वीजेच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन, अग्नितांडव सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.