कारवाईस टाळाटाळ करणार्या तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई! मिर्झापूरमध्ये पकडलेली वाळू बेकायदाच; सव्वा लाखाच्या दंडासह ‘अखेर’ गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्यात धांदरफळ शिवारात सामाजिक कार्यकर्ते साहेबराव वलवे यांनी बेकायदा वाळू वाहतुक करणारा टीप्पर पकडला होता. यावेळी मोठा गदारोळ होवून टीप्पर चालकाने दमदाटी करीत आपले वाहन पळवून नेले होते. याबाबत संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांनी आदेश देवूनही कारवाईस टाळाटाळ करण्यात आली होती. आता या घटनेला पंधरवडा उलटत असतांना यातील एकेका कडीवर कारवाई केली जात असून बेकायदा वाळू वाहतुक करणार्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यासह त्यांना सव्वा लाख रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. या एकूण प्रकरणात तलाठी रामदास मुळे यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे दिसून आल्याने आता त्यांच्यावरही कारवाईची कुर्हाड कोसळली असून त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहे.
याबाबत डोळासण्याचे मंडलाधिकारी कैलास खाडे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार 27 ऑक्टोबररोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास धांदरफळ-मिर्झापूर रस्त्यावरील बाचकर वस्तीजवळ टीप्पर क्र.एम.एच.17/बी.वाय.774 या वाहनातून चालक व मालक सुहास पुंडे व त्याचा भागीदार अण्णासाहेब सुधाकर वाकचौरे (दोघेही रा.ढोकरी, ता.अकोले) हे वरच्या बाजूला कृत्रिम वाळूचा थर देवून त्याखाली नदीपात्रातील वाळू दडवून नेत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव वलवे यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी याबाबत उपविभागीय अधिकार्यांना माहिती दिल्यानंतर तहसिलदार अमोल निकम यांच्या आदेशाने आम्ही सदर ठिकाणी कारवाईसाठी गेलो असता आरोपी मजकूर तेथून वाहनासह गायब झाल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
सदर टीप्परमधून वाहतूक करुन आणलेली वाळू त्यांनी ज्या ठिकाणी खाली केली होती, तेथे जावून तलाठी रामदास मुळे यांनी त्याचा पंचनामाही केला होता. त्यावरुन गेल्या 09 नोव्हेंबररोजी संगमनेरच्या तहसिलदारांनी सदरील टीप्परवर दंडात्मक कारवाई करण्यासह बेकायदा गौण खनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी संबंधिताविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशान्वये आता संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मंडलाधिकारी खाडे यांच्या तक्रारीवरुन वरील दोघांविरोधात भा.द.वी.कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात घटनेच्या दुसर्या दिवशी संगमनेरच्या तहसिलदारांनी प्राप्त अहवालानुसार संबंधित वाळू वाहतुकदाराकडे असलेल्या परवान्याची खातरजमा केली असता वेळेची मर्यादा संपल्यानंतरही संबंधित वाहनातून त्याच परवान्यावर कृत्रिम वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का करु नये अशा आशयाची पंधरा दिवसांची नोटीस टीप्पर चालक व मालकाला बजावण्यात आली होती. त्या मुदतीत संबंधितांनी कोणताही समाधानकारक खुलासा न केल्याने अखेर त्यांच्यावर 1 लाख 25 हजार 355 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली असून दंडाची रक्कम न भरल्यास वाहनाचा लिलाव करुन त्यातून ती रक्कम वसुल केली जाणार आहे.
यासोबतच संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांनी आदेश देवूनही घटनेच्या वेळी घुलेवाडीत असल्याचे सांगणारे कामगार तलाठी रामदास मुळे माहिती मिळाल्यानंतर तब्बल तीन तासांनी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांची ही कृती वाळू तस्करांना मदत करणारीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधिताविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश उपविभागीय अधिकार्यांनी तहसिलदारांना बजावले होते. त्यानुसार संगमनेरच्या तहसिलदारांनी तलाठी आर.एम.मुळे यांच्यावर शिस्तभंगाचा प्रस्ताव पारीत करतांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 चे नियम 5 उपनियम (3) मधील तरतूदीनुसार त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद केली आहे. या वृत्ताने महसूल कर्मचार्यांसह वाळू तस्करांमध्येही खळबळ उडाली आहे.