यंदाचा रामनवमी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा होणार ः काळे साई संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
नायक वृत्तसेवा, शिर्डी
यंदाचा रामनवमी उत्सव साईभक्तांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने साजरा करून देशभरातून येणार्या लाखो भाविकांना साई पालखी घेऊन येण्यास देखील परवानगी देण्यात आली असल्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
श्री साईबाबा संस्थानच्यावतीने वर्षभर असंख्य साईभक्तांच्या उपस्थितीत विविध सण-उत्सव साजरे केले जातात. यामध्ये रामनवमी उत्सव, गुरु पौर्णिमा उत्सव, श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव आदी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. मात्र दोन वर्षांपासून संपूर्ण विश्वावर आलेल्या जीवघेण्या महामारीमुळे हे उत्सव धार्मिक पद्धतीने साध्या स्वरूपात साजरे करण्यात आले. यावेळी करोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्यामुळे साईभक्तांना उपस्थितीत राहण्याची मुभा नसल्यामुळे लाखो साईभक्तांचा हिरमोड झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदाचा रामनवमी उत्सव साजरा करण्याबाबत विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच साई संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपाध्यक्ष जगदीश सावंत, विश्वस्त आमदार जयवंत जाधव, डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, अॅड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत आदी मान्यवर उपस्थित होते.
9 ते 11 एप्रिल असा तीन दिवस साजरा करण्यात येणारा रामनवमी उत्सव हा साईभक्तांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने साजरा केला जावा. तसेच मागील दोन वर्षांपासून करोना संकटामुळे साईभक्तांना रामनवमी उत्सवात साई पालखी आणण्यास परवानगी नव्हती. करोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी रामनवमीला देशभरातून लाखो साईभक्त साईपालखी घेऊन येत असतात त्यांना यावर्षी साईपालखी घेऊन येण्यास देखील परवानगी देणेबाबत एकमताने मंजुरी देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष काळे यांनी दिली आहे. यावेळी स्व. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली ठराव घेण्यात आला. याचबरोबर रामनवमी साजरा करण्याबरोबरच इतर विषयांवर देखील विश्वस्त मंडळाने सविस्तर चर्चा केली.