पुणे-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; खड्डे हुकवायच्या नादात घडताहेत अपघात..! रोज लाखात टोल वसूल करुनही साधे खड्डे बुजविण्याची ठेकेदार कंपनी घेईना तसदी..


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा, एकल घाट, डोळासणे व चंदनापुरी घाट या सर्व ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यातून खड्डे हुकवायच्या नादात वाहनचालकांकडून अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन रोज लाखात टोल वसूल करणार्‍या ठेकेदार कंपनीला तात्काळ हे खड्डे बुजविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांतून जोर धरु लागली आहे.


पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा बाह्यवळण, नवीन माऊली एकल घाट, डोळासणे उड्डाणपूल व चंदनापुरी घाट या सर्व ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी छोट्या-मोठ्या वाहनचालकांना खड्डे दिसत नसल्याने भरधाव वेगात असणार्‍या वाहनावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. यातून ती वाहने खड्ड्यांमध्ये जोरदार आदळत असतात. यामध्ये वाहनाचे नुकसान होण्याबरोबर चालक, वाहक अथवा प्रवाशांना गंभीर इजा होत आहे. मध्यंतरी पावसाळ्यात तर या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायचे. तर महामार्गावर देखील कमरेएवढे पाणी यायचे. यातून वाहनचालक जीवावर उदार होऊन प्रवास करायचे. मात्र, दरडी कोसळणे, सर्व्हिस रोडची अपूर्णता याप्रमाणे याकडेही कानाडोळा करुन कंपनीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. तीन ते चार दिवसांपूर्वीच खड्डा हुकवायच्या नादात एक कार पलटी झाली. मात्र दैव बलवत्तर असल्याने कारचालक बालंबाल बचावला. तत्पूर्वी याबाबत अनेकांनी आवाज उठविला. परंतु आर्थिक तडजोडीतून हा आवाजी शमल्याने कंपनीचे चांगलेच फावले असून वाहनचालकांच्या मात्र जीवावर बेतत आहे.


दरम्यान, महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार करून करूनही याकडे संबंधित विभाग आणि ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करत आहे. यापूर्वी देखील विविध कारणांनी ठेकेदार कंपनी चर्चेत राहिली आहे. एरव्ही छोट्या-मोठ्या मालवाहू आणि प्रवासी वाहनांकडून लाखो रुपयांचा टोल वसूल केला जातो. त्यानुसार महामार्गाची देखभाल करणे देखील तितकेच गरजेचे आहे. परंतु ‘सुनता है कौन’ प्रमाणे संबंधित विभाग आणि ठेकेदार कंपनी डोळ्यांसह कानांवर हात ठेवून असल्याचेच यावरुन अधोरेखित होत आहे. त्यामुळे टोल प्रशासनाच्या कारभारावर परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महामार्ग पूर्णत्वास जाण्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिल्या, वाहनचालकही मोठ्या प्रमाणात टोल भरतात. त्यानुसार सुविधा देणे टोल प्रशासनाला क्रमप्राप्त असतानाही साधे महामार्गावरील खड्डे बुजविण्याची तसदी देखील घेत नसल्याने संबंधित ठेकेदार कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तर आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकावर पांढर्‍या रंगाचे पट्टे नसल्याने अपघातांची श्रृंखलाच झाली आहे. त्यामुळे टोल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे, अशी अपेक्षाही नागरिकांसह वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.

One thought on “पुणे-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; खड्डे हुकवायच्या नादात घडताहेत अपघात..! रोज लाखात टोल वसूल करुनही साधे खड्डे बुजविण्याची ठेकेदार कंपनी घेईना तसदी..

  • October 7, 2020 at 2:42 pm
    Permalink

    कऱ्हे घाटात मोठे खड्डे पडले आहेत, कडेला बाभळी वाढल्या आहेत, अपघाताला निमत्रण
    लक्ष देत नाहीत

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *