मेव्हण्याला मारले.. पुरून टाकले!

नायक वृत्तसेवा, देवळाली प्रवरा 
राहुरी तालुक्यातील एका गावात चार सख्ख्या बहिणींवर झालेल्या बाललैंगिक अत्याचाराच्या  तपासादरम्यान आरोपी बजरंग कारभारी साळुंके याने स्वतःच्या मेहुण्याचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली अन् आणखी एक धक्कादायक घटना उजेडात आली. साळुंके याने सांगितलेल्या जागेवर पोलिसांनी खोदकाम करुन साळुंके याने गाडलेला मृतदेह बाहेर काढला.
दवणगाव येथील बजरंग साळुंके याच्यावर चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. पीडित मुलींनी ‘स्नेहालय’ संस्थेच्या मदतीने राहुरी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून साळुंकेला अटक करून कोठडीत ठेवण्यात आले होते. पीडित मुलींचे आई-वडील विभक्त रहायला लागल्यानंतर त्या मुलींची सांभाळण्याची जबाबदारी साळुंके याने घेतली होती. मात्र त्यानेच या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ‘स्नेहालय’ संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी या संतापजनक प्रकाराचा भांडाफोड केला. चार मुलींमध्ये एक सज्ञान असून उर्वरित तिघी अनुक्रमे १६, १४ आणि १० वर्षांच्या आहेत.त्यातील विवाहित मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला होता.
 अखेर तिने पतीला हा प्रकार सांगितल्यावर या घटनेचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी साळुंकेसह त्याच्या पत्नीलाही अटक केली होती. चौकशीत साळुंकेने आपला मेहुणा नितेश जगन्नाथ सारंगधर (गाडेकर) याचा मार्च २०२५ मध्ये गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. तसेच नितेश याचा खून केल्यानंतर रात्री घरामागील शेतात खड्डा खोदून मृतदेह पुरल्याची माहितीही त्याने पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला.या कारवाईसाठी राहुरीचे नायब तहसीलदार संध्या दळवी, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खान, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी प्रसाद मासाळ, दत्तात्रय सातपुते, बाळासाहेब वैराळ, तसेच नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी सोमनाथ सूर्यवंशी, विकास गडाख, अकील शेख, विशाल खरात, किशोर सरोदे, दानिश पठाण, किरण मकासरे, अनिल लाहुंडे, निळकंठ लगे, योगेश भारती, शुभम साळुंके आदी उपस्थित होते. वैद्यकीय पथकाने घटनास्थळीच शवविच्छेदन केले.
Visits: 162 Today: 1 Total: 1959226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *