प्रकल्पबाधित शेतकर्यांच्या अडचणी तातडीने सोडवा ः काळे कोपरगाव तहसील कार्यालयात विविध खात्यांच्या अधिकार्यांना सूचना

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असून राज्य शासनाच्यावतीने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्याची प्रशासनाने योग्य अंमलबजावणी करून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. समृद्धी महामार्ग व एन. एच. 160 महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत अशा प्रकल्पबाधित शेतकर्यांच्या अडचणी तातडीने सोडवा, अशा सूचना साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी मुख्य प्रशासकीय अधिकार्यांना दिल्या.

कोपरगाव तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे यांनी मुख्य प्रशासकीय अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, वासुदेव देसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप गाडे, दहिफळे, पाटबंधारे विभागाचे गायकवाड, ससाणे, पोळ, भूमी अभिलेखचे अवचरे, गायत्री कन्स्ट्रक्शनचे सुमेध वैद्य उपस्थित होते.

आमदार काळे म्हणाले, समृद्धी महामार्ग व सिन्नर-शिर्डी एन. एच. 160 महामार्गामध्ये शेतकर्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. बहुतांश प्रकल्पबाधित शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्याबाबतीत येत असलेल्या अडचणी दूर करून त्यांना लवकरात लवकर मोबदला देण्यासाठी प्रयत्न करा. शासन दरबारी अडचणी येत असतील तर मला सांगा. त्याबाबत योग्य मार्ग काढून या अडचणी सोडविल्या जातील. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ओमायक्रॉनचे नवीन संकट देश व राज्यापुढे उभे आहे. त्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना, नियमावली देण्यात आली आहे. तसेच काही निर्बंध देखील घालण्यात आले आहेत. त्या निर्बंधांची कोपरगाव तालुक्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मात्र अंमलबजावणी करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. यावेळी जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, सुधाकर होन, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, सागर लकारे आदिंसह ग्रामसेवक उपस्थित होते.
