पिंपरी लोकईमध्ये बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू; परिसरात भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, राहाता
वडिलांच्या न कळत त्यांच्या मागे शेतात चालत गेलेल्या सहा वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. हल्ला झाल्याचे लक्षात आल्यावर त्याचे वडील आणि शेतातील अन्य ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळाल्याने बालकाचा जीव वाचला. राहाता तालुक्यातील पिंपरी लोकई या गावात ही घटना घडली आहे. जनार्दन बाळासाहेब गाडेकर (वय 6) असे बालकाचे नाव आहे. त्याच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दिव्यांग असलेले बाळासाहेब गाडेकर यांची घराजवळच शेती आहे. शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी ते गेले होते. तेव्हा त्यांचा मुलगा जनार्दन घराजवळच खेळत होता. वडील शेताकडे निघाल्याचे पाहून तोही त्यांच्या न कळत मागोमाग चालत गेला. शेतात गेल्यावर वडील ठिबक सिंचन यंत्रणेचे पाईप बदलत होते. तेव्हा जनार्दनही त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. शेजारीच जनावारांना चारा म्हणून लावण्यात आलेले गवत होते. त्यातून एक बिबट्या आला आणि त्याने जनार्दनवर हल्ला केला. तेव्हा तो ओरडल्याने त्याच्या वडिलांचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी आराओरड करीत त्याच्याकडे धाव घेतली. त्यावेळी शेतात काम करीत असलेल्या इत शेतकर्‍यांनी आवाज दिला. त्यामुळे गांगरलेला बिबट्या जनार्दनला सोडून पळून गेला.

या हल्ल्यात जनार्दनच्या डोक्याला आणि मानेला मोठी जखम झाली आहे. त्याला प्रथम जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जखमा पाहून डॉक्टरांनी त्याला लोणी येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला लोणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात बिबट्याचा वावर आहे. काही दिवसांपूर्वीही शेतकर्‍यांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत.

Visits: 8 Today: 1 Total: 115642

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *