घारगावचे मंजूर पोलीस ठाणे डोळासणेला स्थलांतर होणार? जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव सादर; सात वर्षांपासून निधी अखर्चित..

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शेहेचाळीस गावांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणार्या घारगाव येथे पोलीस ठाणे व्हावे ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानंतर 2010 मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र केवळ जागेच्या अडचणीमुळे हे पोलीस ठाणे आता डोळासणे येथे स्थलांतरित होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी घारगाव वसलेले असून संपूर्ण पठारभागाचा केंद्रबिंदू म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्याचबरोबर पूर्वी याठिकाणी पोलीस चौकी होती. त्यामुळे येथेच पोलीस ठाणे व्हावे म्हणून तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्याकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर 2010 मध्ये घारगाव पोलीस ठाण्याला मंजुरी मिळाली आणि 2015 मध्ये 5 कोटी 79 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीमध्ये पोलीस निवासस्थाने, पोलीस ठाणे इमारत, पोलीस निरीक्षक निवासस्थान आदिंचा समावेश आहे.

मात्र, याबाबत अनेकदा वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी घारगाव येथे येऊन जागेची पाहणी केली. त्यावेळी कधी रस्त्याची अडचण तर कधी जागेची अडचण असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यानंतर आंबीखालसा फाटा येथेही वन विभागाच्या जागेची पाहणी करण्यात आली होती. मात्र त्या संदर्भात पुढे हालचाली झाल्या नाही. अखेर घारगाव पोलीस ठाण्याने डोळासणे येथील गट क्रमांक 382 या जागेचा प्रस्ताव प्रांताधिकार्यांकडे पाठवला होता, त्यांच्याकडून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. वास्तविक पाहता आत्तापर्यंत घारगाव येथे पोलीस ठाणे होणे गरजेचे होते. मात्र त्यातही जागेची अडचण, जागाही चांगलीच पाहिजे अशा पद्धतीने वरीष्ठ पोलीस अधिकार्यांमुळे हे काम रखडल्याचा सूर असून, शेवटी घारगावला मंजूर असलेले पोलीस ठाणे डोळासणे येथे होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

