संगमनेरच्या वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! शाळेसमोरच लोंबकळली विद्युत वाहिनी; सतर्क नागरिकांमुळे अनर्थ टळला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वीज वितरण कंपनी म्हणजे शासकीय विभागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली कंपनी समजली जाते. प्रामाणिक ग्राहकांवर रुबाब आणि चोरट्यांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती यामुळे हा विभाग नेहमीच प्रामाणिक ग्राहकांच्या रोषाचा बळी ठरतो. भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता हा भागही वाढीस लागल्याने एकंदरीत भलामोठ्ठा पगार गिळून खुर्चीवरच ढिम्मपणे बसून राहण्याची वृत्तीही बळावली आहे. त्याचा परिणाम वेळेवर वीजबिलं भरुनही ग्राहकांना कधीही अखंडीत वीज पुरवठा मिळत नाही. किरकोळ वादळ-वार्‍यानेही तासन् तास बत्ती गूल हा प्रकार तर नेहमीचाच. त्या अवगुणात आणखी भर पडली असून कंपनीच्या हलगर्जीपणातून आज सकाळी शेकडो जणांच्या जीवावर बेतणारा प्रसंग उभा राहिला होता. हा प्रकार महावितरणच्या अकार्यक्षमतेचे सर्वात मोठे उदाहरण म्हणून समोर आला असून त्यातून पादचारी, प्रवासी आणि विद्यार्थी असा कितीतरी जणांचा जीव धोक्यात आला होता. सुर्दैवाने काही जागरुक नागरिकांनी वेळीच एकमेकांना सावध केल्याने अनर्थ टळला, मात्र यातून वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

संगमनेर शहराच्या गावठाण भागात अरुंद रस्ते आणि दाट लोकवस्तीमुळे विद्युत पुरवठा करणार्‍या वाहिन्या, त्यासाठी उभारलेले खांब, रोहित्र अशांचा कोंडवळा हे नेहमीचेच चित्र. गावठाणाचा भाग शेकडो वर्षांपूर्वी वसलेला असल्याने त्याच्या रचनेत बदल असंभव आहे. मात्र नव्याने वाढणार्‍या शहरात त्या उणीवा दूर व्हाव्यात व नागरिकांना अधिक मुक्त वातावरण मिळवून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असते. संगमनेरच्या बाबतीत मात्र हा प्रकार दिसून येत नाही. भविष्याचा विचार करुन शहर नियोजनच होत नसल्याने दिवसेंदिवस गचाळपणा वाढत आहे. अरुंद रस्त्यांवरील अतिक्रमण त्यात आणखी भर घालणारे आहेत. साहजिकच रस्ते अरुंद असले की मुलभूत सुविधा देणार्‍या गोष्टींचीही दाटी होते. जसे सांडपाणी, पिण्याचे पाणी, विद्युत कनेक्शन, केबल, इंटरनेट अशा कितीतरी गोष्टी त्यात समाविष्ट होतात.

त्यातही सतत प्रवाह घेवून वाहणार्‍या वीजवाहिन्या म्हणजे सर्वत्र प्रकाश निर्माण करणारी, विकासाची दालनं उघडणारी प्रगतीची गंगोत्रीच, मात्र त्याची दुसरी बाजू त्याच्याशी सजीवाचा थेट संबंध आला की त्या जीवघेण्याही ठरतात. असाच बाका प्रसंग आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अकोले नाक्यावरील जाजू पेट्रोलपंपासमोर घडला. सर्वकाही सुरळीतपणे सुरु असताना पंपालगतच्या सिग्नलजवळून रस्ता ओलांडून भरीतकर मळ्याकडे गेलेली वीजवाहिनी अचानक खाली आली. हा प्रकार काहींच्या लक्षात आल्याने सदरची वाहिनी जमिनीवर येण्यापूर्वीच प्रवाशांसह पादचारीही सावध झाले. हा सगळा प्रकार काही मिनिटांत घडला अन्यथा तारेचा स्पर्श होवून अनेकांच्या जीवावर संकट उभे राहिले असते.

चिंताजनक म्हणजे पेट्रोल पंपासमोरच मालपाणी विद्यालय आहे. या विद्यालयात अकोले नाक्याच्या बाजूने येणारे शेकडो विद्यार्थी आहेत. शिवाय सध्या म्हाळुंगी नदीचा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने ओहरा महाविद्यालय व सराफ शाळेकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांचीही मोठी संख्या असते. मात्र सुदैवाने त्यावेळी शाळा भरलेली असल्याने विद्यार्थ्यांचा राबता नव्हता. अन्यथा अनर्थ अटळ असता अशी चर्चा परिसरात होती. याबाबत तातडीने वीज कंपनीला कळविल्यानंतर काही काळ विद्युत पुरवठा बंद करुन सदरील वाहिनी पूर्ववत करण्यात आली. मात्र या प्रकारातून वीज कंपनीचा भोंगळ कारभार मात्र चव्हाट्यावर आला.

शाळेजवळील विद्युत खांब, वाहिन्या, रोहित्र, नियंत्रण करणारे बॉक्स या गोष्टींची नियमितपणे तपासणी होण्याची गरज असते. मात्र प्रत्यक्षात वितरण कंपनीत भ्रष्टाचारातून कामचुकारपणा वाढीस लागल्याने नागरी सुरक्षा आणि ग्राहकांचे हित याच्याशी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी दुरावत चालले आहेत. या गोष्टींचा कंपनीच्या वरिष्ठांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ज्या प्रामाणिक ग्राहकांच्या जीवावर आपल्याला गलेलठ्ठ पगार, वरकमाई आणि सुविधा मिळतात, त्यांच्याप्रति थोडीतरी इमानदारी दाखवण्याची गरज आहे. अन्यथा एकदिवस वितरण कंपनीवर संतप्त ग्राहकांचा हल्ला असे वृत्त प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.

वितरण कंपनी अनेकदा शनिवारी मेटेंनन्सच्या नावाखाली शटडाऊन घेते. मग अशावेळी शाळांजवळील विद्युत वाहिन्या, रोहित्र, नियंत्रण पेट्या, खांब सुरक्षित आहेत की नाही याची तपासणी केली जाते का? की कंपनीला एखाद्या अपघाताची प्रतीक्षा आहे? खरेतर हा प्रकार अतिशय गंभीर आणि चिंताजनक असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अकोले नाक्यावरील आजचा प्रसंग अनेकांच्या जीवावर बेतणारा होता. सुदैवाने अनर्थ टळला मात्र या घटनेने व्यवस्थेकडे लक्ष वेधले असून त्याचा बोध घेण्याची गरज आहे.

Visits: 55 Today: 1 Total: 117985

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *