चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणार्यास दहा वर्षांचा कारावास! अकोले नाक्यावरील घटना; संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार पाठलाग, अश्लिल टोमणे, चित्रपटातील गाणे म्हणून सतत त्रास देणे, घरापाहेर पडल्यावर मागे येणे, एकटीला गाठून चाकूचा धाक दाखवित शरीरसंबंध ठेवण्यास सांगणे अन्यथा पती व मुलीला ठार मारण्याची धमकी देणे. 16 एप्रिल 2020 रोजी रात्रीच्यावेळी शौचास जाताना पाठीमागून येवून चाकूचा धाक दाखवित अत्याचार करणे अशा आशयाच्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू भिमराज शिंदे याला संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी दहा वर्षा सश्रम कारावासासह 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबतची हकिकत अशी की, अकोले नाका परिसरात राहणार्या एका विवाहितेला त्याच परिसरात राहणारा आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू भिमराज शिंदे हा सतत दोन ते तीन वर्ष त्रास देत होता. सदरील विवाहिता घराबाहेर पडली की तो तिचा पाठलाग करीत तिला अश्लि भाषेत टोमणे मारायचा, तिला पाहून काहीतरी बोलायचा, सिनेमातील गाणी म्हणून खुणवायचा व वेगवेगळे हावभाव करायचा यासोबतच सदरील महिला एकटी दिसल्यास तिला चाकूचा धाक दाखवित ‘तु जर माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून शारीरिक संबंध कायम केले नाहीत तर मी तुझ्यासह तुझी मुलगी व पतीलाही ठार मारील’ अशी धमकी द्यायचा.

सदरील आरोपी जुगाराचा अड्डा चालविणारा असल्याने त्याच्याकडे काही गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा सतत वावर असत. त्यामुळे पीडित महिला त्याला घाबरुन होती. त्याचाच गैरफायदा घेवून 16 एप्रिल 2020 रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास पीडित महिला शौचास जात असतांना आरोपी जितेंद्र शिंदे पाठीमागून आला व त्याने नेहमीप्रमाणे पीडितेला दमबाजी केली. यावेळी आसपास कोणीही नसल्याचा व अंधाराचा फायदा घेत त्याने आपल्याकडील सुर्याचा धाक दाखवून पीडितेचे कपडे फाडले व बळजोरीने तिच्यावर शारीरिक अत्याचारही केला.

हा त्रास नेहमीच होणार असल्याची कल्पना असल्याने त्याचवेळी पीडितेने जोरजोराने आरडाओरड केल्याने आरोपी तेथून पसार झाला. अशा आशयाचा तक्रार अर्ज पीडितेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल केला होता. त्यावरुन पोलिसांनी आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याच्याविरोधात अत्याचाराच्या कलम 376 सह 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यानंतर नरेंद्र साबळे यांनी पूर्ण करुन आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकारी अभियोक्ता संजय वाकचौरे यांनी एकूण सहा साक्षीदार तपासतांना न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर करीत जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणात पीडितेने न्यायालयासमोर नोंदविलेला जवाबही या खटल्यात अत्यंत महत्त्वाचा ठरला. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद तसेच, पीडितेने दिलेला जवाब ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू भिमराज शिंदे याला अत्याचाराच्या प्रकरणात दोषी धरुन त्याला 10 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्याचे संपूर्ण कामकाज सरकारी अभियोक्ता संजय वाकचौरे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विनय परदेशी, पोलीस हवालदार भुतांबरे, प्रवीण डावरे, महिला पोलीस दीपाली दवंगे, स्वाती नाईकवाडी व प्रतिभा थोरात यांनी सहाय्य केले. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात या खटल्याचा निकाल लागला. या खटल्याकडे संगमनेर शहरातील नागरिकांचे लक्ष लागून होते.

