‘पुणे-नाशिक’ सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गाला आणखी बळ! सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भरीव निधी द्या; आमदार सीमा हिरे यांची मागणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाच्या कारणास्तव रद्द करण्यात आलेल्या प्रस्तावित ‘पुणे-नाशिक’ या देशातील पहिल्या सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मागणीला आणखी बळ मिळाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा रेल्वेमार्ग गुंडाळण्याची घोषणा केल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रस्तावित मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र आणून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याला आता नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या मागणीने आणखी ताकद मिळाली असून सिंहस्थापूर्वीच या प्रकल्पासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित प्रकल्पाच्या मागणीसाठी आत्तापर्यत तिघा खासदारांसह सहा विद्यमान आमदारांनी जोर लावला असून त्यात आता आणखी एका आमदाराची भर पडल्याने या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा आशा निर्माण झाल्या आहेत.
प्रयागराजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यात सुमारे 67 कोटीहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. 45 दिवस चाललेल्या या महापर्वाने उत्तरप्रदेशचे अर्थकारण आकाशाला भिडल्यानंतर दोन वर्षांनी नाशिकमध्ये पार पडणार्या सिंहस्थाबाबतही चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उत्तरप्रदेशच्या धरतीवर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करुन त्या माध्यमातून नाशिकसह आसपासच्या परिसराचा विकास करण्याचे धोरण जाहीर केले आहे. प्रयागराज कुंभमेळ्याला भाविकांचा प्रतिसाद बघता नाशिक सिंहस्थालाही लाखों भाविक उपस्थित राहतील असा अंदाज असल्याने शासनाने आत्तापासूनच त्याच्या तयारीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी भाजपच्या नाशिक उत्तरच्या विद्यमान आमदारांनीही नाशिक-पुणे सेमी-हायस्पीडची गरज व्यक्त करीत त्यासाठी भरीव निधीची मागणी केल्याने जवळजवळ बांसनात गेलेल्या या प्रकल्पाबाबतच्या आशाही पुन्हा जागृत झाल्या आहेत.
सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार हिरे यांनी 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या या महापर्वात देशभरातून कोट्यवधी भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज वर्तवला आहे. अशावेळी नाशिकमधील दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम असण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी शहरातंर्गत वाहतुकीसाठी मैलाचा टप्पा ठरणारी नियो मेट्रो, ड्रायपोर्ट, शिवसृष्टी आणि प्रस्तावित पुणे-नाशिक लोहमार्गाच्या कामासाठी तातडीने भरीव निधी देवून या प्रकल्पांची कामं तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या सातलाख कोटींच्या अर्थसंकल्पाची प्रशंसा करताना गरीबांसाठी घरं, वीज बिलातून कायमस्वरुपी सुटका देणारी सौरऊर्जा यंत्रणा, मेट्रोद्वारा विमानतळ जोडण्याची मोहीम, 26 लाख महिलांना लखपती बनवणारी योजना, दावोसमधून आणलेली 16 लाख कोटींची गुंतवणूक, नदीजोड प्रकल्पाचा उल्लेख करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनंही उधळली आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांना कुंभमेळ्याच्या तयारीचा चांगला अनुभव असल्याने यावेळी सिंहस्थाचे देशभरात ब्रॅडींग होणार असल्याचेही आमदार हिरे म्हणाल्या. शहरातंर्गत वाहूक कोंडीतून दिलासा देणारी प्रस्तावित नियोमेट्रो, शेतकर्यांची शेती उत्पादने मुंबईत नेण्यासाठी ड्रायपोर्ट, सिंहस्थासाठी पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून येणार्या लाखों भाविकांसाठी उपयुक्त ठरणारा नाशिक-पुणे लोहमार्ग प्रकल्प, शिवप्रेमींच्या पसंदीला उतरलेली शिवसृष्टी आणि जिल्ह्याचे भाग्य बदणारा नदीजोड प्रकल्प सरकारने अजेंड्यावर घेवून त्याला भरीव निधी देण्याची जोरदार मागणीही त्यांनी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीने बांसनात गुंडाळल्यात जमा असलेल्या बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक या प्रस्तावित रेल्वेमार्गाला आणखी बळ मिळाल्याने त्याबाबतच्या आशाही जागल्या आहेत.
‘जीएमआरटी’ प्रकल्पाची बाधा सांगून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्ग रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसह लोकप्रतिनिधींमध्येही नाराजी निर्माण झाल्याने विधान परिषदेचे सदस्य, आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत मुंबईत या मार्गावर येणार्या तिनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना एका पंख्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद देताना आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे-पाटील, अमोल खताळ, बाबाजी काळे, शरद सोनवणे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे व राजाभाऊ वाझे यांच्यानंतर आता नाशिक शहराच्या (उत्तर) सीमा हिरे यांचेही पाठबळ मिळाल्याने या रेल्वेमार्गाच्या मागणीला अधिक जोर येणार आहे.