अवैध गुटखा व दारु विरोधात शहर पोलिसांचा एल्गार! घुलेवाडी शिवारात गुटखा व्यावसायिकावर तर वैदूवाडीत दारु विक्रेत्यावर छापा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील कालखंडात शहर व परिसरात अवैध व्यावसायिकांचा वावर वाढला असून शहरात बेकायदा दारु, गांजा, मटका व गुटख्याच्या व्यावसायिकांनी उच्छाद मांडला आहे. या अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आता एल्गार पुकारला असून गेल्या काही दिवसांपासून अवैध मार्गाने गुटखा तस्करी करणार्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याच कडीत रविवारी घुलेवाडी शिवारात छापा घालून तीन हजारांचा गुटखा तर वैदूवाडीत छापा घालीत साडेबाराशे रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घुलेवाडी शिवारातील एका पत्र्याच्या शेडावर छापा घातला असता तेथे अवैध गुटख्याच्या साठा आढळून आला. त्याची मोजदाद केली असता त्यात 1 हजार 680 रुपयांचा हिरा पानमसाला, 420 रुपये किंमतीची रॉयल सुगंधी तंबाखू, 792 रुपयांचा विमल पानमासाला व 88 रुपयांची सुगंधी तंबाखू असा एकूण 2 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

याप्रकरणी पो.कॉ.अविनाश बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी घुलेवाडीतील विलास सुकदेव भंवर (वय 40) याच्यावर भा.दं.वि. कलम 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या कलम 59, 26(2)(4) प्रमाणे गुन्हा दाखल करुन संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिसांनी गुटखा तस्करांविरोधात एल्गार पुकारला असून एकामागून एक कारवायांचा सपाटा लावल्याने गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम शहरातील पान टपर्यांवरील गुटख्याच्या किंमती आभाळाला खेटल्या असून अव्वाच्या सव्वा किंमतीने गुटखा विक्री केली जात आहे.

दुसर्या एका कारवाईत पोलिसांनी बेकायदा मार्गाने देशी दारु विक्री होणार्या वैदूवाडी येथील ठिकाणावर छापा घातला. यावेळी राजू रामा लोखंडे हा इसम आपल्या राहत्या घराच्या आडोशाला दारु विक्री करीत असल्याचे पथकाला आढळले. मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयित आरोपी मुद्देमाल जागेवरच सोडून पसार झाला. यावेळी पोलिसांनी त्याच्या घराच्या आडोशाला लपवून ठेवलेल्या बॉबी संत्रा नावाच्या देशी दारुच्या साडेबाराशे रुपये किंमतीच्या 24 बाटल्या हस्तगत केल्या. या प्रकरणी पो.कॉ.ज्ञानदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन राजू लोखंडे याच्यावर दारुबंदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बीट हवालदार पी.एन.पवार यांच्याकडे सोपविला आहे. या वृत्ताने अवैध गुटखा व दारु विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील बेकायदा गुटखा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड करण्याचे सत्र राबविले आहे. त्याचा परिणाम शहरातील पान टपर्यांवर होणार्या गुटखा वितरणावर झाला असून गुटख्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा गैरफायदा घेत पुरवठादारांनी गुटख्याचे दर वाढवल्याने किरकोळ विक्रेते ग्राहकांकडून अधिक पैशांची मागणी करीत आहेत. त्यामुळे शहरातील पान टपर्यांवरील गुटख्यांचे दर गगनाला भिडले आहेत. पोलिसांनी गुटखा विरोधात पुकारलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून पोलिसांनी सातत्यपूर्ण कारवाया करुन शहरातून गुटखा हद्दपार करावा अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

