संगमनेरच्या सुसंस्कृत लोकनेत्याची प्रतिमा डागाळण्याचे कारस्थान! कडव्या निष्ठेचे मूर्तीमंत उदाहरण; कोट्यवधी लोकांच्या मनात आहे अढळ स्थान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदारसंघातील नाट्यमय घडामोडीनंतर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर नाशिकमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेवून आपल्याच पक्षाने आपल्याभोवती षडयंत्राचे जाळे विणल्याचा घणाघात केला होता. त्याचे वास्तव दर्शन आता हळूहळू होवू लागले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच आपल्या व्यक्तिगत महत्त्वकांक्षेसाठी संपूर्ण पक्षाला अडचणीत आणू पहात आहेत. त्यातूनच त्यांनी अवघ्या राज्यात सुसंस्कृत लोकनेता म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा डागाळण्याचे कारस्थान रचल्याचे दिसू लागले असून राज्यातील जनता हे कधीही सहन करणार नाही अशी भावना जनमानसातून समोर येत आहे. खुद्द थोरात यांनीही आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधताना आपण व्यथित झाल्याचे सांगून आज काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामाही दिला आहे. त्यामुळे राज्यासह अहमदनगरमधून संताप व्यक्त होवू लागला असून अडगळीत चाललेल्या काँग्रेसला राज्यात पुन्हा सन्मान मिळवून देणार्या लोकनेत्याचा आवाज ऐका आणि पक्ष संपवणार्यांवर कारवाई करा अशी मागणी समोर येवू लागली आहे.

निष्ठा कशाला म्हणतात याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. सुमारे 95 वर्षांपासून काँग्रेस विचारांची पालखी वाहणार्या परिवारातील घटक असलेल्या बाळासाहेबांना पक्षातंर्गत राजकारणाचा त्रास पहिल्यांदाच होतोय असेही नाही. मुळी राजकारणातील त्यांच्या प्रवेशावेळीच त्यांना हा कटू अनुभव सोबत घ्यावा लागला होता. सन 1985 साली संगमनेरच्या जनमानसातून त्यांच्या उमेदवारीची मागणी होत असतानाही पक्षांतर्गत कुरघोडीतून त्यांना डावलण्यात आले. मात्र त्यावेळी ते थांबले असते, तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी राहिली असती या विचारातून त्यांनी पक्षाची चूक लक्षात आणून देण्यासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य ठरल्याचे त्यावेळच्या निवडणूक निकालातून स्पष्टही झाले आणि त्यांची काँग्रेस विचारांशी बांधिलकीही त्यावेळी दिसून आली.

तेव्हापासून आजवर अनेकदा काँग्रेस अंतर्गत संघर्षातून वेगवेगळे गट निर्माण झाले. मात्र बाळासाहेब थोरात यांनी कधीही सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी हयातभर जोपासलेला विचारांचा वारसा आपल्यापासून दूर जावू दिला नाही. अगदी 1999 साली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसची कास सोडून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हाही कार्यकर्त्यांचा आग्रह असतानाही त्यांनी काँग्रेस विचारांची प्रतारणा होवू दिली नाही. तेथवरचा त्यांचा काँग्रेसमधील प्रवास फारसा सुखकर होता असेही नाही. दीड दशकांच्या त्यांच्या या राजकीय प्रवासात त्यांना अनेकदा पक्षातील काहींच्या द्वेषाचा आणि त्यातून आकाराला आलेल्या षडयंत्रांचा वेळोवेळी अनुभव आला, मात्र प्रत्येकवेळी त्यांनी तो आपल्या कडव्या निष्ठेच्या जोरावर परतवूनही लावला.

1999 साली राज्यातील युती सरकार जावून आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच पाटबंधारे विभागाचे राज्यमंत्रीपद मिळाले. या संधीला सुवर्णसंधी मानताना त्यांनी केवळ भूमिपूजन आणि घोषणांच्या फेर्यात अडकलेल्या निळवंडे धरणाच्या कामाला गती देण्याचे ध्येय समोर बाळगले आणि संगमनेर शहराच्या पारंपारिक पाणी टंचाईवर रामबाण उपाय शोधून या धरणाच्या मुख्य भिंतीत संगमनेरसाठी थेट पाणी पुरवठा करणारा पाईप टाकून नवा इतिहासही घडवला. तेव्हापासून आजवर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करताना त्यांनी सामान्य माणूस आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून अविरतपणे काम केले.

त्यांची काम करण्याची पद्धत, बोलण्या-वागण्यातला सुसंस्कृतपणा आणि पक्षावरील कडवी निष्ठा यामुळे अवघ्या दोन दशकांच्या राजकीय प्रवासातच त्यांनी राज्यातील स्वपक्षासह विरोधकांवरही आपल्या सुसंस्कृत स्वभावाचे गारुड केले. 2014 साली देशात नरेंद्र मोदी नावाचा उदय झाल्यानंतर देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मोठे स्थित्यंतर घडले जे आजही सुरुच आहे. मात्र बाळासाहेब थोरात त्यामुळे बिल्कुल विचलित झाले नाहीत. या दरम्यान राज्यातही सत्ताबदल झाला व भाजप-सेना युती सत्तेत विराजमान झाली. त्यानंतरचा काळ राज्यातील काँग्रेससाठी अतिशय खडतर ठरला. अनेक नेते पक्षाची साथ सोडून भाजपच्या वळचणीला गेले, मात्र थोरातांनी सत्तेसाठी पक्ष बदलण्याचा विचारही मनाला स्पर्श होवू दिला नाही.

त्यांची लढाऊ वृत्ती आणि पक्षावरील अढळ निष्ठा पाहून त्यांना राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळी राज्यातून काँग्रेस हद्दपार होते की काय अशीही स्थिती निर्माण झालेली होती. मात्र थोरात यांनी न डगमगता पक्षकार्य सुरु केले आणि राज्यातून काँग्रेस संपली असं म्हणणार्यांना चोख उत्तर देत राज्यात महाविकास आघाडीचे सूत्र निर्माण करुन पक्षाला सत्तेत आणून बसविले. 2019 सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची संगमनेरात सभा झाली, त्यानंतर ते संगमनेरात मुक्कामीही थांबले. सभेला झालेली गर्दी, थोरातांची यंत्रणा आणि त्यांच्यातील काम करण्याची स्फूर्ती पाहून गांधीही त्यावेळी हबकले होते. मात्र बाळासाहेब थोरात त्यानंतरही हुरळून मात्र गेले नाहीत.

काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला. नांदेड जिल्ह्यातून 6 नोव्हेंबरला राज्यात दाखल झालेल्या या यात्रेचा पुढे चौदा दिवस महाराष्ट्रातच तळ होता. या चौदा दिवसांत राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला व बुलढाणा या पाच जिल्ह्यातील 384 किलो मीटरचे अंतर कापून ही यात्रा मध्यप्रदेशात गेली. या दरम्यान राहुल गांधी यांच्या विविध ठिकाणी दहा कॉर्नर सभा, नांदेड व विदर्भात प्रत्येकी एक अशा लाखोंची गर्दी असलेल्या सभाही झाल्या. एकंदरीत राहुल गांधी यांना अपेक्षीत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. माध्यमांच्या द्वारे यासर्व गोष्टी नागरिकांपर्यंत पोहोचल्या, मात्र या सगळ्याच्या मागे सर्वकाही निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी सांभाळणारे बाळासाहेब थोरात मात्र पडद्या मागेच राहीले. येथे त्यांच्या प्रसिद्धी लोलुप नव्हेतर पक्षावरील निष्ठेचेच दर्शन घडून आले. त्यांच्या याच सुसंस्कृतपणातून काँग्रेसमधील सर्वात विश्वासार्ह नेता म्हणून त्यांची ठळक ओळख निर्माण झाली.

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेने त्यांना सत्तास्थानी तिसर्या क्रमांकाचे महसूल मंत्रीपद देण्यात आले. तेथूनच पक्षातंर्गत असलेले त्यांचे हितशत्रू त्यांच्याबाबत कारस्थानांचे कुभांड रचायला लागले. मात्र राजकारणात पाऊल ठेवल्यापासून सोबत घेतलेली सुसंस्कृत नेत्याच्या आपल्या प्रतिमेला त्यांनी कधीही डाग लागू न दिल्याने षडयंत्रकारी नेत्यांना त्यांना बदनाम करण्याची एकही संधी मिळाली नाही. नाना पटोले 2014 साली काँग्रेसमधून भाजपात गेले आणि 2017 मध्ये नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी असल्याचा त्यांना साक्षात्कार त्यांना झाला. त्या कारणावरुन त्यांनी भाजपसोडून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2019 मध्ये राज्यात आश्चर्यकारकपणे सत्तांतर घडले.

सत्ता वाटपाच्या सूत्रात विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आल्याने नाना पटोलेंची त्या पदावर निवड करण्यात आली. मात्र पुढे जावून फेबु्रवारी 2021 मध्ये त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेल्याने त्यांना सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून त्यांच्या मनात बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल द्वेष खदखदत असल्याचे वेळोवेळी समोर आले असून नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या मनातील मळमळ स्पष्टपणे समोर आली आहे. त्यामुळेच त्यांनी या निवडणुकीशी कोणताही संबंध नसतानाही संगमनेरच्या लोकनेत्याला नाहक वादात खेचण्याचा प्रकार केला असून त्यातून काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन घडण्यासह बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या कोट्यवधी लोकांच्या मनात स्थान असलेल्या लोकनेत्याची सुसंस्कृत प्रतिमा डागाळण्याचे षडयंत्र पद्घतशीरपणे राबविले जात आहे. मात्र राज्यातील जनता हे कधीही सहन करणार नाही हे येणारा काळ सांगणारच आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचे निमित्त साधून काँग्रेसमधील थोरात विरोधकांनी राबविलेल्या पद्धतशीर षडयंत्राने व्यथित होवून ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळाच्या गटनेते पदाचा राजीनामा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठविला आहे. तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. मात्र, थोरात आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. याबाबत रविवारी संगमनेरात आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात ऑनलाइन संवाद साधताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावरुन व्यथित असल्याचे सांगताना आजच्या घडामोडीचे संकेत दिले होते. मात्र, ते कोणाच्याही लक्षात आले नाही. आज आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी आपल्या मनातील व्यथा पक्षाला पाठविलेल्या राजीनाम्यातून व्यक्त केल्या आहेत.

