श्रीरामपूरमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली तिघांना पाठलाग करुन पकडले; दोघे पळून जाण्यात यशस्वी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील इंदिरानगर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. यातील तिघे पोलिसांच्या हाती लागले तर दोघे मोटारायकलवरून पसार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांकडून पोलिसांनी एक चाकू, नायलॉन दोरी, मिरची पूड, लोखंडी कटावणी असे दरोडा टाकण्यासाठीचे साहित्य हस्तगत केले आहे.

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काहीजण इंदिरानगर ओव्हर ब्रीजजवळ फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस नाईक सचिन बैसाणे व पोलीस पथकास तत्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाठविले. शिरसगाव हद्दीतील इंदिरानगर भागात, ओव्हर ब्रीजजवळ पाचजण फिरत असताना या पथकाला दिसले. या संशयित इसमांना पोलीस आल्याचे समजताच त्यांनी त्याठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले तर दोघे मोटारसायकलवरून भरधाव पळून गेले. त्यांचा पाठलाग करण्यात आला, परंतु ते मिळून आले नाहीत.

या पकडलेल्या आरोपींमध्ये निसार रज्जाक शेख (वय 38), राजू श्यामराव दामोधर (वय 43) तौफिक आयुब पठाण (वय 27, तिघेही रा. हुसैननगर, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. या आरोपींची अंगझडती घेतली असता निसार शेख याच्याजवळ एक चाकू, नायलॉन दोरी, राजू दामोधर याच्या पॅन्टच्या खिशात मिरची पूड तर तौफिक पठाण याच्या जवळ लोखंडी कटावणी मिळून आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई गौरव दुर्गुळे यांनी फिर्याद दिली असून वरील पाच आरोपींविरुध्द गुरनं. 88/2022 भादंवि कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याa मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस नाईक पंकज गोसावी, पोलीस नाईक बिरप्पा करमल, पोलीस नाईक सचिन बैसाने, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस शिपाई राहुल नरवडे, गौतम लगड, रमीज अत्तार, गौरव दुर्गुळे, महेश पवार यांनी केली आहे.
