वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे उत्तरेतील व्यवस्था बनली अशक्त! सामान्यांसाठी न्याय झाला दुरापास्त; उपविभागीय पोलीस अधिकारीच बनले निरीक्षक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सदृढ व्यवस्थेत गुन्हेगारी घटनांसह राजकीय हस्तक्षेप वाढला की संपूर्ण व्यवस्थाच खिळखिळी होते याचा अनुभव सध्या उत्तर नगर जिल्ह्यातील तीन तालुके घेत आहेत. साखरसम्राटांचा परिसर म्हणून लौकिक असलेल्या उत्तरेतील संगमनेर, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांची अवस्था सध्या अशाच स्थितीतून जात आहे. जिल्ह्याच्या प्रगतीत मैलाचा दगड ओलांडणार्‍या या तालुक्यांच्या कायदा व व्यवस्थेच्या अंमलबजावणीत खमक्या अधिकार्‍यांची कमतरता निर्माण झाल्याने सध्या येथील सदृढ असलेली व्यवस्था अशक्त बनली आहे. त्याचा परिणाम गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होण्यात झाला असून सामान्य नागरिकांना न्यायासाठी पोलीस ठाण्यांऐवजी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांची कार्यालये गाठावी लागत आहेत. एकामागून एक घटना समोर येवूनही या स्थितीत बदल होत नसल्याने या तीनही तालुक्यांच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला असून आता सामान्यांसह राजकीय धुरिणांकडूनही ‘खमक्या’ अधिकार्‍यांची मागणी होवू लागली आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळापासून साखर उद्योगामुळे नावारुपाला आलेल्या आणि जिल्ह्याच्या उद्योग विश्वाला दिशा दाखवणार्‍या श्रीरामपूर शहराची अवस्थाही सध्या बिकट आहे. येथील पोलीस ठाण्यात आजवर अनेक पोलीस निरीक्षकांनी आपल्या जबाबदार्‍या पार पाडल्या असून श्रीरामपूरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे आणि त्यासोबतच आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या मनात कायद्याविषयी आणि पर्यायाने पोलिसांविषयी सन्मान निर्माण करण्याचे काम केले आहे. मागील वर्षभराच्या काळात मात्र येथील सामाजिक व्यवस्था कमालीची ढासळली आहे. पोलिसांच्या कामात वाढलेला राजकीय हस्तक्षेप आणि त्या माध्यमातून बोकाळलेली गुन्हेगारी ही त्यामागील प्रमुख कारणं असल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे.

गेल्या वर्षी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणार्‍या पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी येथील गुन्हेगारी विश्वावर पोलिसांची जरब बसवण्यात यश मिळविले होते. त्यांच्या कार्यकाळात सामान्य माणसांच्या फिर्यादी ऐकून त्यावर तत्काळ कृतीही होत असल्याने एकंदरीत शहराचे वातावरण सुव्यवस्थित होते. मात्र त्याचवेळी श्रीरामपूर शहर हद्दीतील एकलहरे येथे मोठ्या प्रमाणात गुटखा सापडल्याच्या घटनेचा ठपका ठेवून त्यांना कंट्रोल जमा केल्यानंतर त्यांची बाह्य जिल्ह्यात बदली झाली. सदरची कारवाई आणि त्यात पो.नि.बहिरट यांची भूमिका आजही वादातीत असली तरीही त्यांच्यावरील कारवाईनंतर श्रीरामपूरात खमक्या अधिकार्‍याची वाणवा निर्माण झाल्याने आजच्या स्थितीत श्रीरामपूरात गुन्हेगारांचे साम्राज्य निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे.

जिल्ह्याच्या विकासात मोलाचा वाटा असलेल्या राहुरी शहर पोलीस ठाण्याची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. खंडणी, खून, चोर्‍या, दरोडे यासह अवैध व्यवसायांचा सुळसुळाट यामुळे हे शहर जिल्ह्याच्या गुन्हेगारी वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिले आहे. मध्यंतरीच्या काळात या शहराच्या कायदा व व्यवस्थेची जबाबदारी खांद्यावर घेवून राहुरी पोलीस ठाण्याची धुरा सांभाळणार्‍या नंदकुमार दुधाळ यांच्या सारख्या खमक्या पोलीस निरीक्षकाने अल्पावधीतच गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय निर्माण केले होते. राहुरीतील त्यांच्या अल्पकाळातच सामान्य जणांच्या मनात ते ‘हिरो’ ठरले. मात्र त्यांच्या खमक्या भूमिकेलाही राहुरीतील राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण लागल्याने त्यांनाही कारवाईचा सामना करावा लागला आणि एका धडाकेबाज अधिकार्‍याला सुरुवातीला कंट्रोल आणि नंतर बेलवंडीसारख्या पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील आपले राहिलेले दिवस मोजण्याची वेळ आली.

जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात पुढारलेल्या आणि विभाजनानंतर जिल्हा मुख्यालयाच्या मागणीत अग्रभागी असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याची कहाणीही श्रीरामपूर-राहुरीतील स्थितीचे दर्शन घडवणारीच आहे. येथील वाढत्या गुन्हेगारी घटनांसोबतच पोलिसांवर जमावाने केलेला हल्ला, त्या प्रकरणात शहर पोलीस दलाचे पालक असलेल्या निरीक्षकांची कचखाऊ भूमिका, त्यातच या प्रकरणाच्या कारवाईत झालेला राजकीय हस्तक्षेप आणि त्यातून पोलीस कर्मचार्‍यांच्या मानसिकतेचे झालेले खच्चीकरण. यासोबतच येथील बेकायदा कत्तलखान्यांवर राज्यातील आजवर झालेली सर्वात मोठी कारवाई, गांजा तस्करांचा वाढता प्रभाव अशा एकामागून एक गुन्हेगारी घटना समोर येवूनही पोलिसांकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने आणि अशा काही प्रकरणांत पोलिसांचेच पाठबळ असल्याचे समोर येवूनही त्याचा ठपका निश्चित करण्यात जिल्हा पोलीस प्रमुखांना अपयश आल्याने येथील कायदा व सुव्यवस्था कागदावर प्रभावी भासत असली तरीही ती आतून मात्र पूर्ण पोखरली गेली आहे.

वास्तविक श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट असोत अथवा राहुरीचे तत्कालीन निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी घटनांचे संदर्भ देवून कारवाईचा सामाना करावा लागला. संगमनेरची स्थिती मात्र त्यापेक्षा वेगळी ठरली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात संवेदनशील म्हणून गणल्या जाणार्‍या या शहरात गुन्हेगारांचे साम्राज्य फोफावण्यासह पोलीस निरीक्षकांच्या हलगर्जीपणातून जातीय तणाव निर्माण होण्याच्या घटना घडूनही त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई झाली नाही. अर्थात यामागे राजकीय कारणे असल्याचे नंतरच्या काळात समोर आले. मात्र यातून जिल्ह्याच्या अन्य पोलीस ठाण्यांना एक व संगमनेर पोलीस ठाण्याला दुसराच न्याय दिसून आल्याने उत्तरेतील कायदा व व्यवस्था अशक्त बनल्याचेच दिसून येत आहे.

विशेष म्हणजे एकीकडे संगमनेरसह श्रीरामपूर व राहुरी पोलीस ठाणी तेथील बोकाळलेल्या गुन्हेगारीचे प्रदर्शन घडवित असतांना संगमनेर व श्रीरामपूर उपविभागीय अधिकार्‍यांची भूमिका मात्र जनमानसात पोलिसांविषयी आदर राखणारी ठरली आहे. या कालावधीत पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी बजावलेली भुमिका श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील सामान्य जनतेच्या स्मरणात राहील अशीच ठरली आहे. त्यांच्या कामाचा धडाका पाहून पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील डिझेल तस्करीपासूनअहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीत प्रकरणापर्यंतचे अनेक प्रमुख तपास त्यांच्यावर सोपवून जनमानसातील त्यांची प्रतिमा अधोरेखीतच केली आहे. सध्या त्यांच्यावर अहमदनगर शहराची जबाबदारी असतांनाही ते श्रीरामपूर विभागाची जबाबदारी पेलीत आहेत, त्यावरुन त्यांची क्षमताही दिसून येते.

अवाढव्य आकारात पसरलेल्या संगमनेर उपविभागात अकोले तालुक्यासारख्या दुर्गम भागात कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी घेवून संगमनेरात दाखल झालेल्या पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांचे कामही संपूर्ण उपविभागात पोलिसांचा जनसामान्यांच्या मनातील विश्वास कायम ठेवण्यास कारणीभूत ठरला आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातील जवळपास चारशे गावांचा व्याप, संगमनेर व अकोले सारखी राजकीय धुरिणांची सतत वर्दळ असणारी शहरे कायद्याच्या कक्षेत ठेवण्यासाठी त्यांनी सर्वच घटकांशी साधलेला समन्वय सामान्य माणसांच्या मनातील पोलिसांचे स्थान उंचावणारे आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणींची सोडवणूक करण्याची थेट जबाबदारी नसतांनाही या दोन्ही अधिकार्‍यांनी बजावलेले कर्तव्य आज उत्तरेतील या तीनही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास देणारे ठरले आहे.

Visits: 26 Today: 1 Total: 117541

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *