प्रवरा परिसरातील निर्मोही साधूला साधन-संपत्तीची लालसा! गंगामाई ट्रस्टच्या विश्वस्तांवर हल्ला; तिघा साधूंसह चौघांवर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनाधिकाराने बळकावलेल्या जागेत राहून चक्क त्यासह विश्वस्त संस्थेची संपूर्ण जागाच आपल्या हक्काची असल्यागत वागून विश्वस्तांनाच लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्याचा अजब प्रकार संगमनेरातून समोर आला आहे. या धक्कादायक प्रकरणी गंगामाई विश्वस्त मंडळाच्या फिर्यादीवरुन त्यांच्याच जागेत अतिक्रमण करुन उभ्या राहीलेल्या कपील आश्रमाचा कथित महंत महिंद्रपुरी याच्यासह चौघांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मोही राहण्याचे वचन स्वीकारुन संतत्त्व प्राप्त केलेल्या मात्र तरीही साधन-संपत्तीच्या मोहात अडकलेल्या या महंताला यापूर्वीही अशाच दंबगाईमुळे कारागृहाची वारी घडली होती. आता पुन्हा एकदा त्याने हातात काठी घेवून संपत्ती ओरबाडण्याचा प्रयत्न सुरु केल्याने त्याच्यासाठी कारागृहाची कवाडे उघडली गेली आहेत.

याबाबत संगमनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवराकाठावरील कपील आश्रमाचा महंत महिंद्रपुरी याने आपल्या साथीदारांसह गंगामाता विश्वस्तांवर सशस्त्र हल्ला केला. गेल्या बुधवारी (ता.9) सकाळी गंगामाई परिसरातील उद्यानात शहरातील अन्य नागरिकांसह गंगामाता मंदिराचे सदस्य गोपाळ भुतडा, नीलेश जाजू, कैलास इंदाणी व ओमप्रकाश आसावा यांच्यासह सुभाष कोथमिरे हे व्यायाम करीत होते. यावेळी उद्यानातील बाकड्यावर बसलेल्या दोघा साधूंनी त्यांना आपल्याकडे बोलावले. सदरचे साधू गेल्या काही दिवसांपासून कपील आश्रमात मुक्कामास असल्याने ही सर्व मंडळी त्यांना ओळखत होती.

यावेळी जवळ आलेल्या मंडळींना ते साधू म्हणाले की; ‘तुम्ही लोकं आम्हाला न विचारता गंगामाईची जागा कार्यक्रमासाठी कसे काय देता?’ हा अजब प्रश्न ऐकून गंगारलेल्या त्या मंडळींनी सदरची जागा गंगामाता मंदिराची असून विश्वस्त संस्थेच्या मालकी हक्काची असल्याचे त्यांना सांगितले. त्यांच्यात संवाद सुरु असतांनाच श्याम कासार नावाची व्यक्ति तावातावाने तेथे आली व त्याने ‘तुम्ही साधुसंतांना दमदाटी का करता’ असे म्हणत त्या सगळ्यांना दमबाजी सुरु केली. काही क्षणातच कपील आश्रमाचा महंत महिंद्रपुरी आपल्या दोघा साथीदारांसह लाठ्या-काठ्यांसह तेथे अवतरला. त्याने तेथे येताच ‘तुम्ही बाबांना जाब विचारणारे कोण?’ असे म्हणत मोठ्याने आरडाओरड करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी कैलास इंदाणी व गोपाळ भुतडा या दोघांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने व कासार याने हातातील काठीने त्यांना मारहाण केली. महिंद्रपुरीच्या अन्य साथीदारांनी उर्वरीत सर्वांवर दादागिरी करीत त्यांना मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. मात्र सदरील मंडळी संत असल्याने त्यातील कोणीही त्यांना खालच्या पातळीवर प्रत्युत्तर दिले नाही. विशेष म्हणजे गंगामाता मंदिराची साफसफाई व सुरक्षेसाठी विश्वस्त मंडळाने एक जोडपे ठेवले आहे. काही वर्षांपूर्वी संबंधित कामगाराचा मृत्यू झाल्याने तेव्हापासून त्याची पत्नी व मुले तेथे राहतात व वरील कामे करतात. सदर महिला एकटी असल्याने तिची वाताहत नको म्हणून विश्वस्त मंडळाने त्यांना तेथून काढले नाही.

मात्र महंत महिंद्रपुरीचा या गोष्टीला विरोध असून त्या महिलेला तेथून हटविण्यासाठी तो सतत विश्वस्त मंडळाशी वाद घालीत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन संगमनेर शहर पोलिसांनी कपील आश्रमाचा महंत महिंद्रपुरी, भीमाशंकरपुरी, श्याम जयराम कासारसह एका अनोळखी इसमावर भारतीय दंडसंहितेच्या कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरील प्रकरण धार्मिक भावनांना जोडलेले असल्याने पोलिसांकडून सखोल तपास करुनच कारवाई होणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

संगमनेरच्या प्रवराकाठी श्री गंगामाता मंदिर विश्वस्त संस्थेची मोठी जागा आहे. गेल्या अनेक दशकांपासून या विश्वस्त संस्थेकडून येथील मंदिरांची व्यवस्था पाहीली जाते. फार पूर्वी येथील मंदिरांच्या समुहात असलेल्या छोटेखानी हनुमान मंदिरात (टेकडी) ब्रह्मलीन बहिरेबाबा यांचे आगमन झाले व त्यांनी या मंदिरात राहुनच त्याचा जिर्णोद्धार व सुशोभीकरण केले. गंगामाता विश्वस्त संस्थेच्या मालकीच्या सुमारे एक गुंठा जागेत त्यांनी कपील आश्रमाची निर्मितीही केली व शेवटपर्यंत त्यांचे तेथेच वास्तव्य राहिले. बहिरेबाबा ब्रह्मलीन झाल्यानंतर या आश्रमाच्या परिसरातच त्यांना समाधी देण्यात आली. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य महिंद्रपुरी यांची बाबांचे उत्तराधिकारी म्हणून नेमणूक झाली, मात्र सुरुवातीपासूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व वादात राहिले.

अतिशय दिव्य अनुभूती प्राप्त असलेल्या बहिरेबाबांनी या परिसरातील वृक्षसंपदा वाढवण्यासह परिसराचे पावित्र्य कायम राखले जाईल यासाठी हयातभर परिश्रम घेतले. त्यांना मानणारा मोठा वर्ग संगमनेरात निर्माण झाला. त्यांच्या पश्च्यात झालेला सोळशी सोहळा आजही संगमनेरकरांच्या स्मरणात आहे. त्यांच्या समाधी सोहळ्यासाठी संपूर्ण भारतभरातून शेकडों महंत व साधुसंत संगमनेरात आले होते. त्यांच्या संचाराने हा संपूर्ण परिसर पावन-पवित्र झाला होता. मात्र त्यानंतर काही कालावधीतच आश्रमाची हद्द वाढवण्याच्या प्रयत्नात वाद सुरु झाले, त्यातून नव्याने गादीवर बसलेल्या कपील आश्रमाच्या महंतांनी अनेक वर्ष जुनी असलेली असंख्य झाडे तोडून टाकली. त्यातून मोठा वादही निर्माण झाला होता.

याच हद्द वाढीच्या प्रयत्नात त्यांनी गंगामाता विश्वस्त संस्थेसह पालिकेच्या हद्दितही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले. अशाच वादातून त्यांच्यावर यापूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल असून त्या प्रकरणात त्यांना कारागृहातही रहावे लागले होते. गंगामाता विश्वस्त मंडळासोबतही त्यांचे यापूर्वी वाद झालेले असून त्यातूनच कपील आश्रमाची संपूर्ण जागा गंगामाता विश्वस्त संस्थेच्या मालकीची असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मंदिर परिसराचे वाढीव बांधकाम झाल्यानंतर त्यांनी तसा फलकही दर्शनी भागात लावलेला आहे. मात्र आता जागाच नाही तर संपूर्ण विश्वस्त मंडळावरच ताबा घेण्याच्या हेतूने त्यांनी विश्वस्तांवरच हल्ला केला. यासाठी त्यांनी बाहेरुन आलेल्या दोन साधुंसह अन्य लोकांचाही वापर केला. त्यामुळे संगमनेरच्या प्रसन्न प्रवराकाठी पूज्य बहिरेबाबांच्या आश्रयाने पावन झालेला हा घाट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कपील आश्रमाच्या महंताकडून वारंवार होणारा त्रास, दबावतंत्र व आत्ताच्या घटनेत तर थेट मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने गंगामाई विश्वस्त मंडळाने गंगामाई परिवाराचे सदस्य आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची रविवारी (ता.13) भेट घेतली व त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यांनीही तत्काळ पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना पाचारण करुन या प्रकरणाचा लवकर निपटारा करण्याचे निर्देश दिले आहेत.


.

Visits: 10 Today: 1 Total: 79816

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *