वाईन विक्रीपेक्षा दुग्ध व्यवसायात शेतकर्यांचे हित ः कानवडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली चौफेर टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करणे म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण आहे. त्याऐवजी कृषीप्रधान महाराष्ट्राला दुग्ध व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले तर त्यात शेतकर्यांचे हित होईल, अशी टीका भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीष कानवडे यांनी सरकारवर केली आहे.

वाईन विक्रीच्या निर्णयावरुन राज्य सरकारला धारेवर धरत जिल्हाध्यक्ष कानवडे म्हणाले, शेतकर्यांना शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन, पशुसंवर्धन व दुुुग्ध व्यवसायाला चालना देऊन तत्कालीन मुख्यमंत्री, प्रख्यात कृषीतज्ज्ञ वसंत नाईक यांनी सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात धवलक्रांती घडवून आणली. या क्रांतीचा शेतकरी व पशुपालकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले असून, ‘शेतकरी हिताचे निर्णय’ या गोंडस नावाखाली किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय होत असेल तर भावी काळात मद्यक्रांतीचे जनक ठाकरे, पवार व थोरात अशीच ओळख येणार्या तरुण पिढीमध्ये होईल. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यास आघाडी सरकार प्रवृत्त करत आहे. स्व. वसंतराव नाईक यांच्या विचारांना पुरोगामीचा चेहरा असलेले महाराष्ट्र सरकार तिलांजली देऊन मद्यक्रांतीचे जनक होऊ पाहत आहे अशी घणाघाती टीका कानवडे यांनी केली.

महाराष्ट्रात धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, भात, कडधान्ये पिकांनंतर दूध उत्पादन हाच ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित केल्या जाणार्या एकूण दुधापैकी राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायास प्राधान्य देऊन शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. दुधाला उसाप्रमाणेच एफ. आर. पी. धोरणानुसार भाव मिळाला पाहिजे, शेतकर्यांना संकरित गायी, म्हशी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. वास्तविक पाहता वाईनमध्ये चार ते पाच टक्के अल्कोहोल आहे, तरी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, ‘काही देशांत लोक पाण्याऐवजी वाईन पितात.’ पवारांना पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब महाराष्ट्रात करायचा आहे का? असा प्रश्न कानवडे यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात ‘वाईन म्हणजे दारु नव्हे’ असा अजब दावा करत आहेत. यामागे राज्यातील वाईनरी उद्योग कोणाचे आहे? हे उद्योग सुरू करून सरकार कोणाचे हित साधत आहे असे अनेक प्रश्न सतीश कानवडे यांनी उपस्थित केले आहेत.
