पालकमंत्री नव्हेतर खासदारांनी केली होती ‘एसडीआरएफ’ची शिफारस! एका मृतदेहासाठी चौघांचा बळी; प्रकरणाच्या सखोल चौकशीची होत आहे मागणी..

श्याम तिवारी, संगमनेर
गेल्या आठवड्यात सुगांवमधील प्रवरापात्रात घडलेल्या दुर्घटनेवरुन तापलेले वातावरण अद्यापही थंड झालेले नाही. पोहताना बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा शोध घेण्यासाठी निळवंडे धरणाचे आवर्तन बंद करण्याचा अथवा नैसर्गिक तत्वाने मृतदेह बाहेर येण्याची प्रतिक्षा करण्याचा मार्ग असतानाही एका पुढार्‍याच्या शिफारशीवरुन एसडीआरएफला पाचारण करण्यात आले. थेट मंत्रालयातून फोनाफोनी झाल्याने धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची संपूर्ण तुकडीच सुगांवमध्ये दाखल झाली. मात्र अपूर्‍या सुविधा, अपूर्ण पूर्वतयारी आणि अर्धवट माहितीच्या आधारे घाईगडबडीत शोधकार्य सुरु केले गेल्याने बोट उलटून एका अधिकार्‍यासह चौघांचा बळी गेला. या घटनेचे पडसाद अद्यापही अकोल्यातून उमटत असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र आता सुगांवमध्ये दाखल झालेली एसडीआरएफची तुकडी पालकमंत्र्यांच्या नव्हेतर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शिफारशीवरुन आल्याचा सबळ पुरावाच दैनिक नायकच्या हाती लागला आहे. या दुर्घटनेत शोधकार्यात असलेल्या स्थानिक तरुणाचाही जीव गेल्याने सुगांवमध्ये अद्यापही संताप खद्खद्त आहे.

गेल्या आठवड्यात बुधवारी (ता.22) मुरघास तयार करणार्‍या मजुरांच्या टोळीतील सागर जेडगुले व अर्जुन जेडगुले हे दोघे तरुण सुगांवच्या प्रवरापात्रात आंघोळ करीत असताना बुडाले. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह त्याच दिवशी सायंकाळी पाण्याबाहेर आल्याने हाती लागला, तर दुसरा तरुण मात्र बेपत्ता झाला होता. त्याचा शोध लागावा यासाठी सुरुवातीला सुगांवमधील स्थानिकांनी निळवंडे धरणातून सुरु असलेले उन्हाळी आवर्तन काही काळासाठी थांबवण्याची मागणी केली होती. मात्र त्यावरील निर्णय होण्याआधीच अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून थेट राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) मागणी केली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांच्या मागणीकडे फारसे गांभीर्याने पाहीले गेले नाही.


या दरम्यान शिर्डी लोकसभेचे शिवसेना उमेदवार, खासदार सदाशिव लोखंडे यांना या दुर्घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती, राष्ट्रीय अथवा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला कोणत्या स्थितीत पाचारण केले जाते याबाबत कोणतीही माहिती न घेता त्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून चक्क ‘एनडीआरएफ’च्या तुकडीची शिफारश करुन टाकली. त्यामुळे तो पर्यंत शांत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात अचानक धावपळ वाढली. त्यांनीही केवळ सत्ताधारी गटातील खासदारांचा फोन आहे एवढ्या एकाच निकषावर निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी राज्यावर नेमकी कोणती आपत्ती आली आहे याची कोणतीही खातरजमा न करता थेट मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन प्रभागाच्या संचालकांना तातडीचे पत्र पाठवले.


या पत्रातून राष्ट्रीय आणि राज्य यातील फरक करण्यातही त्यांचे अज्ञान ठळकपणे समोर आले. या पत्रात त्यांनी बुधवारच्या बुडीत घटनेचा उल्लेख करीत स्थानिक पातळीवर शोधकार्य केले असता दोघांमधील सागर पोपट जेडगुले याचा शोध लागल्याचे म्हंटले आहे. तर, बुडालेल्या ठिकाणी नदीपात्रात भोवरा असून शोधकार्य करणार्‍या व्यक्तिंना अडचणी येत असल्याचेनमूद करुन एका व्यक्तिच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठवण्याची विनंती केली. त्यात त्यांनी तहसीलदार मोरे व खासदार लोखंडे यांच्या तातडीच्या मागणी दूरध्वनीचाही आवर्जुन उल्लेख केला. या दूरध्वनीनंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी सरकारमधील उच्चपदस्थ मंत्र्यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनीही कोणतीच खातरजमा न करता मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त सूचनेनुसार कारवाईचे आदेश दिले.


त्यामुळेच एका बुडीत व्यक्तिच्या शोधासाठी धुळ्याहून रातोरात दोन बस आणि अन्य दोन वाहनांमधून दोन-चार नव्हेतर तब्बल 25 जणांची अख्खी तुकडीच पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नेतृत्त्वाखाली सुगांवमध्ये धाडण्यात आली. अकोल्याच्या तहसीलदारांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती देताना घटनास्थळी भोवरा असल्याचा उल्लेख केला होता. याचा अर्थ बंधार्‍याजवळील ‘तो’ भाग अतिशय धोकादायक असल्याची त्यांना पूर्वकल्पना होती. त्यातच गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास दाखल झालेल्या एसडीआरएफच्या पथकाकडे संसाधनांची कमतरता होती. सुगांवचे नदीपात्रही त्यांच्यासाठी नवखे असल्याने अकोल्याच्या तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून पथकाला नदीपात्राची आणि संभाव्य धोक्याची सूचना देण्याची गरज होती.


मात्र यापैकी काहीच घडले नाही. पहाटे अंधारात पोहोचलेल्या एसडीआरएफने दिवस उजेडताच आपली मोहीम सुरु केली. नदीपात्राची व त्यातील खाच-खळग्यांची माहिती नसल्याने त्यासाठी त्यांनी कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या सुगांवमधील गणेश मधुकर देशमुख या तरुणाला सोबत घेतले. त्याच्यासह पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस काँन्स्टेबल वैभव वाघ, राहुल पावरा, पंकज पवार व अशोक पवार असे सहाजण एका बोटीवरुन बंधार्‍याजवळील बुडीतस्थळी गेले. मात्र अर्धवट माहिती, अपूरी संसाधाने आणि पूर्वतयारीच्या अभावाने तहसीलदारांनी केवळ आपल्या ‘संदेशात’ उल्लेख केलेल्या ‘त्या’ जीवघेण्या भोवर्‍यात त्यांची बोट फसली आणि उलटली.


येथील प्रवरेच्या पाण्याला असलेला वेग आणि नदीपात्रातील भोवर्‍याची ताकद परिसरात सर्वश्रृत असतानाही केवळ योग्य मार्गदर्शनाच्या अभावाने आपत्तीच्या काळात हजारोंचे जीव वाचवणार्‍या आपत्ती पथकातील पाचजणांसह सहाजणांचे जीव त्याच भोवर्‍यात अडकून जीवाचा आकांत करु लागले. तोपर्यंत प्रतिसादासाठी धावलेल्या दुसर्‍या बोटीच्या चालकाला भोवर्‍याच्या ताकदीचा अंदाज आल्याने त्यात बसलेल्या पाच जवांनाच्या डोळ्यादेखत त्यांच्या टीमचा लिडर आणि त्यांच्यासह अन्य तिघांना ‘त्या’ भोवर्‍याने गिळून टाकले. या भयंकर दुर्घटनेनंतर तासाभराने अंगात लाईफ जॅकेट असल्याने तिघाही जवानांचे मृतदेह तरंगत बाहेर आले, मात्र दुर्दैवाने त्यांच्यासोबत पाण्यात पडलेल्या गणेश देशमुखचे जॅकेट निसटल्याने भोवर्‍याने त्याला तळाशी नेवून अडकवले.

वास्तविक उन्हाळी आवर्तनाच्या कालावधीत संगमनेर-अकोले तालुक्यात बुडीताची घटना घडण्याचा हा पहिला प्रसंग अजिबातच नव्हता. दरवर्षी अशा घटना पाचवीला पुजलेल्याच आहेत. अशा घटनांमध्ये बेपत्ता झालेल्या इसमांचे मृतदेह देखील यापूर्वी तीन-चार दिवसांनी सापडल्याची असंख्य उदाहरणे आहेत. मात्र यापूर्वी कधीही त्यासाठी राष्ट्रीय अथवा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण केले गेले नाही. यावेळी मात्र एका व्यक्तिच्या शोधासाठी काहीकाळ प्रतिक्षा करणं अपेक्षित असताना किंवा फारच तातडी असल्यास सुरु असलेले आवर्तन काही काळासाठी बंद करण्याचा अगदीच हातातला आणि सोपा पर्याय असतानाही त्यासाठी राजकीय वजन वापरण्यात आले.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षासह थेट वरीष्ठ मंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली गेली. त्यामुळेच धुळ्याहून घाईगडबडीत तब्बल 25 जणांचे पथक अपूर्‍या संसाधनांसह रातोरात सुगांवमध्ये पोहोचले आणि त्यानंतर अवघ्या चारच तासांत त्यातील एका टीमची बोट उलटून तिघा जवानांसह चौघांचा हकनाक बळी गेला. त्यावरुन आता सुगांव व अकोल्यातील वातावरण तापले असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच आवर्तन बंद करण्याऐवजी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण केल्याचे बोलले जात होते, त्यावरुन त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली गेली होती. मात्र आता हाती आलेल्या पत्रातून या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचे व एसडीआरएफचे पथक मागवण्यामागे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे व तहसीलदार सिद्धार्थ मोरे हे दोघेच आग्रही असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.


प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असून त्याचा पदभार निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आला आहे. आपत्तीच्यावेळी जिल्हा कक्षाची भूमिकाही ठरलेली आहे. मात्र सुगांवच्या घटनेत जिल्ह्याच्या आपत्ती कक्षाचे कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय आणि राज्य यातील फरकही भेदू शकले नाहीत. ज्या कारणासाठी थेट आपत्ती प्रतिसाद दलाची मागणी होत आहे, त्याची खरोखरी गरज आहे का याचाही शोध त्यांच्याकडून घेतला गेला नाही. त्यामुळे बुधवारनंतर गुरुवारी घडलेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्या तिघाजवांनासह एका स्थानिक तरुणाच्या मृत्यूला खासदार, निवासी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारच जबाबदार असल्याचे आरोप होवू लागले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होवून सत्य समोर येण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *