पंतप्रधानांच्या वक्तव्याचा संगमनेरात काँग्रेसकडून तीव्र निषेध तहसीलदारांना दिले निवेदन; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत चांगले काम केले असून या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. संसदेमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा सन्मान करण्याऐवजी केलेले अवमानकारक वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असून या वक्तव्याचा संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने निषेध करण्यात आला.

संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय येथे तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने या वक्तव्याच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, गटनेते अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखील पापडेजा, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, सेवादलाचे सुरेश झावरे, तात्या कुटे, जावेद शेख, बाळासाहेब कानवडे, प्रा. बाबा खरात आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकटात अत्यंत चांगले काम केले असून हे काम इतरांना दिशादर्शक ठरले आहे. देशामध्ये सध्या वाढलेली महागाई, बेरोजगारी यावर बोलण्याऐवजी पंतप्रधानांनी काल संसदेमध्ये महाराष्ट्राचे अवमानकारक करणारे वक्तव्य केले ते अत्यंत निंदनीय असून आम्ही याचा निषेध करत आहोत. देशात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्राने कायम देशाला एकात्मतेचे विचार दिले आहे. खरेतर कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राने केलेल्या कार्याचा संसदेमध्ये सन्मान होणे गरजेचे होते. मात्र पंतप्रधानांनी कोरोनावरून महाराष्ट्राबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या. सदर निवेदन नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी स्वीकारले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

Visits: 176 Today: 3 Total: 1584398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *