कोकणकड्याचा ‘सनसेट पॉईंट’ करून देतोय सापुतार्‍याची आठवण! अद्भुत नजारा पाहण्यासाठी राज्यातील पर्यटक घेताहेत घाटघरकडे धाव..

संजय महानोर, भंडारदरा
अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या घाटघरच्या (ता.अकोले) घाटणदेवी येथील कोकणकड्याचा ‘सनसेट पॉईंट’ प्रत्यक्षात सापुतार्‍याची आठवण करुन देत आहे. यामुळे आता सापुतार्‍याला जाण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया अनेक निसर्गप्रेमी देऊ लागले आहेत.

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील घाटघर म्हणजे सर्वात जास्त पर्जन्यमान असणारे ठिकाण समजले जाते. याठिकाणाला अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी देखील समजली जाते. डोंगरदर्‍याचा भाग असल्याने निसर्गाचा ठेवा या घाटघरला भरभरुन मिळाला आहे. एका बाजूला हिवाळा धबधबा उंचावरुन कोकणात कोसळत वाहत जातोय तर दुसर्‍या बाजूला टुमदार जगली जनावरांसाठी वाघतळं सुद्धा ठाण मांडून बसल्यासारखं वाटतं. या परिसरात दोन कोकणकडे असून घाटणदेवीचा कोकणकडा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. या कोकणकड्यावरुन मावळता सूर्य पाहणे अतिशय मनमोहक ठरतो. यामुळे पर्यटक तासनतास घाटणदेवीच्या कोकणकड्यावर रेंगाळू लागली आहेत. हा सनसेट पॉईंट प्रत्यक्षात सापुतार्‍याची आठवण करुन देणारा ठरतो.

हा अद्भुत नजारा डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांची पावले आपोआप घाटघरच्या दिशेने वळू लागली आहेत. घाटणदेवीच्या कोकणकड्यावर वन्यजीव विभागाकडून आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून पर्यटकांना सनसटेचा मनमोकळेपणाने आनंद घेता यावा म्हणून सिमेंटची रंगीबेरंगी बाकडेही कोकणकड्याच्या आसपास वन्यजीव विभागाच्या प्रयत्नातून दिसू लागली आहेत. कोकणकड्याच्या उजव्या हाताला अलंग-कुलंग व मलंग गड असून पर्यटक आता या गडासह सेल्फी घेताना दिसून येत आहेत. घाटणदेवीचा हा कोकणकडा म्हणजे भविष्यातील शहापूर ते भंडारदरा हा राजमार्ग ठरणार असून सध्या याच घाटणदेवीच्या वाघ पायवाटेने पाळीव जनावरे पावसाळ्यात कोकणात चरण्यासाठी उतरतात व दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी गुराखी परत याच मार्गाने आपल्या वस्तीला घाटघरकडे येतात.

काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधींनी सुद्धा याच मार्गे खाली कोकणात उतरत पर्यायी रस्त्याची पाहणी केली होती. आणखी एक विशेष म्हणजे या घाटणदेवीच्या कोकणकड्यावर आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले घाटणदेवीचे मंदिर असून याठिकाणी नवरात्रात घटस्थापना केली जाते.अर्थात भंडारदर्‍याच्या या अभयारण्यात सापुतारा उभा करण्याचा छानसा प्रयत्न वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी केला आहे. याकामी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे व घाटणदेवीच्या सनसेट पॉईंटची वनपाल भास्कर मुठे व त्यांच्या यूनिटचे कर्मचारी महिंद्रा पाटील विशेष परिश्रम घेत आहेत.

Visits: 137 Today: 2 Total: 1098176

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *