डिजिटलायझेशनला अर्थसंकल्पातून बळ ः टिळक डब्ल्यूएक्स कन्सल्टंटतर्फे ऑनलाइन व्याख्यान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यावर्षीचा अर्थसंकल्प ‘आयडियालॉजी’ आणि ‘आयडिया’ यांच्यात फारकत करणारा आहे. काळाची गरज ओळखून शिक्षण क्षेत्राच्या डिजिटलायझेशनवर भर दिल्याचे विविध तरतूदीतून दिसते. तर डिजिटल करन्सीसोबत अन्य वेगवेगळ्या माध्यमातून डिजिटलायझेशनला अर्थसंकल्पात बळ दिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले.

डब्ल्यूएक्स कन्सल्टंट प्रा. लि. नाशिक यांच्यातर्फे मंगळवारी (ता.8) अर्थसंकल्प विश्लेषणावर आधारित ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक मेहूल देसाई होते. यावेळी एडिशनल जनरल मॅनेजर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आयपीएफ, मुंबई योगेश बंबार्डेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मुंबईचे अध्यक्ष ललित गांधी, संगमनेर येथील कडलग इनव्हेस्टमेंटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुनील कडलग हे सहभागी झाले होते.

यावेळी पुढे बोलताना टिळक म्हणाले, संरक्षण, लॉजिस्टिक्स, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रात आगामी काळात संधी उपलब्ध होतील. डिजिटल करन्सी या संकल्पनेचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. तसेच क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला. तसेच क्रिप्टो करन्सी व डिजिटल करन्सी एक मानण्याची चूक करायला नको, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. बंबार्डेकर म्हणाले, अर्थसंकल्पानंतर गुंतवणूकदारांचा शेअर मार्केटवरील विश्वास वृद्धींगत होईल. एलआयसीचा आयपीओ शेअर मार्केटसाठी सकारात्मक ठरेल. अध्यक्ष ललीत गांधी म्हणाले, उद्योग क्षेत्राच्या संदर्भात अर्थसंकल्प सकारात्मक राहिला आहे. सर्वसामान्यांनी अर्थसंकल्प कसे घ्यावे, हे समजण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला आहे. सुनील कडलग म्हणाले, अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिल्याने आगामी काळात म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. त्यातून गुंतवणूकदार दीर्घकालीन संपत्ती निर्माण करतील तसेच गुंतवणूकीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल.

प्रास्ताविकात प्रा. दीपाली चांडक म्हणाल्या, अर्थसंकल्पातून संधी शोधत प्रगती साधता येऊ शकते. परंतु अनेकांना अर्थसंकल्प फारसा समजत नाही. सहज, सोप्या भाषेत अर्थसंकल्प उद्योजक, युवक, महिलांसह सर्व घटकांना समजावा, यासाठी दरवर्षी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही चंद्रशेखर टिळक यांनी प्रभावीपणे सर्वांना अर्थसंकल्प समजून सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयिका शाल्मली शेट्टी यांनी केले तर न मनीष पात्रीकर यांनी आभार मानले. संतोष मंडलेचा, निखीलेश काळे, आशिष चांडक, समीर शहा, सचिन शहा, डॉ. किरण सावे, डॉ. मनीष देशमुख, डॉ. दहिकर, डॉ. अग्रवाल, डॉ. ललिथा, सुधाकर देशमुख, लेखापरीक्षक संजय राठी, किशोर हासे, सुरेश चावला आदिंनी व्याख्यानात सहभाग नोंदविला.

Visits: 105 Today: 3 Total: 1102295

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *