संगमनेर तालुक्यात आढळले पुन्हा उच्चांकी रुग्ण! प्रशासनाकडून कारवाईचा फार्स; शनिवारी ‘सील’ झालेली दुकाने उघडली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज वाढतच असून रविवारी त्यात उच्चांकी रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने जिल्हाधिकार्यांनी आढावा बैठका घेवून सक्तिच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. संगमनेरात मात्र कारवाईच्या नावाने नुसता फार्स राबविला जात असून नियमांची पायमल्ली करणार्या आस्थापनांना महिनाभर ‘सील’ ठोकण्याचे आदेश असतांना संगमनेरात मात्र अवध्या चोवीस तासांतच ‘सील’ तोडले जात आहे. त्यामुळे संगमनेरात कोविडच्या नावाने ‘चांगभलं’ सुरु असून रविवारी शहरातील 28 जणांसह तब्बल 71 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आता झपाट्याने 7 हजार 728 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

फेब्रुवारीच्या मध्यापासून जवळपास माघारी परतलेल्या कोविडचा जिल्ह्यात वेगाने प्रादुर्भाव सुरु झाला. त्यातही अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यात गेल्या महिन्याभरात एकामागून रुग्णांना कोविडची लागण होवून या तालुक्यातील कोविड स्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याने परिस्थिती बिघडली आहे. त्या अनुषंगाने गेल्या शुक्रवारी (ता.19) जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेरात येवून अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मास्क आणि सामाजिक अंतर याद्वारेच कोविडचा प्रादुर्भाव रोखणे शक्य असल्याचे ठामपणे सांगत नियमांकडे दुर्लक्ष करणार्यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

विशेष म्हणजे जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा भरीस येण्यामागे लग्नसोहळे आणि काही अन्य गर्दीचे कार्यक्रम कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी गर्दी होणारी मंगल कार्यालये, लॉन्स व दुकाने यामध्ये मास्क आणि सामाजिक अंतराशिवाय गर्दी दिसल्यास अशी ठिकाणे एक महिना ‘सील’ करण्याचे सक्त आदेशही दिले होते. त्यानुसार संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शनिवारी (ता.20) संयुक्त कारवाई करीत बसस्थानकावरील सुप्रसिद्ध सुवर्णपेढी असलेल्या चंदुकाका सराफ या दालनासह नवीन नगर रस्त्यावरील प्रवरा मेडिकल व श्री.ओंकारनाथ मालपाणी रस्त्यावरील राजबक्षी वडा सेंटर या दुकानांनी नियमबाह्य गर्दी जमवून कोविड नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवून ही तिनही दुकाने एक महिन्यासाठी ‘सील’ केली होती.

या घटनेला 24 तासांचा कालावधी उलटायच्या आंतच प्रशासनाने संबंधितांकडून ‘हमीपत्र’ घेत महिन्यासाठी ‘सील’ केलेली दुकाने उघडण्याचीही तितकीच तत्परता दाखविल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. वाजवीपेक्षा अधिक गर्दी झाल्याच्या कारणावरुन प्रशासनाने काही मंगल कार्यालये व दारापुढील विवाह सोहळ्यांच्या आयोजकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला, मग अशी कारवाई झालेल्यांनी ‘माफीनामा’ लिहून दिल्यास त्यांना त्यांची रक्कम परत दिली जाणार का? असा सवालही आता विचारला जात असून अधिकार्यांकडून काहीजणांना मिळणारी अशी ‘विशेष सुट’ संगमनेरचा कोविड आलेख कोठे घेवून जाईल असा सवालही विचारला जात आहे.
या धामधुमीत संगमनेर तालुक्यात कोविडचा मुक्तसंचार सुरुच असून रविवारी (ता.) तालुक्यात पुन्हा एकदा उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शहरातील 28 तर ग्रामीण भागातील 43 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी खासगी प्रयोगशाळेकडून 54 तर शासकीय प्रयोगशाळेकडून मिळालेल्या 17 अहवालातून शहरातील मालदाड रोडवरील 64 वर्षीय महिलेसह 53 वर्षीय इसम आणि 32 वर्षीय तरुण, अकोले बायपासवरील 55 वर्षीय इसम, अशोक चौकातील 53 वर्षीय महिला, बाजारपेठेतील 18 वर्षीय तरुणी, चैतन्यनगर मधील 87 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गणेशनगर मधील 59 वर्षीय इसमासह 29 व 24 वर्षीय महिला आणि 14 वर्षीय मुलगी.

इंदिरानगर मधील 40 व 26 वर्षीय महिलांसह 18 वर्षीय तरुण, जोर्वेनाका येथील 38 वर्षीय तरुण, माळीवाड्यातील 54 वर्षीय महिला, कोल्हेवाडी रोडवरील 52 वर्षीय इसम, नवीन नगर रस्त्यावरील 33 वर्षीय तरुणासह दोन वर्षीय बालक, बँक ऑफ बडोदा कॉलनीतील 52 वर्षीय महिला, अभिनवनगर मधील 43 वर्षीय तरुण, विद्यानगरमधील 42 वर्षीय तरुण, नाशिक रोडवरील 43 वर्षीय तरुण, देवी गल्लीतील 53 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 व 34 वर्षीय महिला संक्रमित झाल्या आहेत.

त्यासोबतच ग्रामीणभागातील गुंजाळवाडी येथील 56 वर्षीय इसमासह 34 वर्षीय तरुण, 47 वर्षीय महिला व सहा वर्षीय बालिका, चंदनापूरी येथील 40 वर्षीय तरुण, अमृतनगरमधील 32 वर्षीय महिलेसह 12 वर्षीय मुलगा, घुलेवाडीतील 38 वर्षीय तरुणासह नऊ वर्षीय मुलगा, निमगाव भोजापूर येथील 36 वर्षीय तरुण, वडझरी येथील 55 वर्षीय इसम, चिंचपूर येथील 49 वर्षीय इसमासह 34 व 21 वर्षीय तरुण आणि 43 वर्षीय महिला, दाढ खुर्द येथील 37 वर्षीय महिला, दरेवाडी येथील 48 व 34 वर्षीय महिलांसह 17 वर्षीय तरुण व 14 वर्षीय मुलगी, नांदुरी दुमाला येथील एक वर्षीय बालिका, निमगाव येथील 70 वर्षीय महिला, 41 व 17 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 36 वर्षीय तरुण,

पळसखेडे येथील 52 वर्षीय इसम, पिंपळगाव देपा येथील 12 वर्षीय मुलगा, रहिमपूर येथील 28 वर्षीय तरुण, मिरपूर येथील 53 वर्षीय महिलेसह 47 वर्षीय इसम व 11 वर्षीय मुलगा, धांदरफळ येथील 32 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 51 वर्षीय इसम, वडगाव येथील 32 वर्षीय तरुण, खंदरमाळ येथील 36 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 68 वर्षीय महिलेसह 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमज येथील 36 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 72 व 21 वर्षीय महिलेसह 37 वर्षीय तरुण आणि पिंपरी येथील 29 वर्षीय तरुण अशा तालुक्यातील 43 जणांसह एकूण 71 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 7 हजार 728 वर पोहोचली आहे.

तालुक्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ‘सी.सी.सी हीींिं://सी.सी.सी/’ सूत्राच्या काटेकोर अंमलबजावणीसह ‘मास्क आणि सामाजिक अंतर’ यांचे सक्तिने पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी आपल्या कारवायांची संख्या वाढवली आहे. मात्र प्रशासनाकडून वारंवारच्या सूचना आणि वाढता प्रादुर्भाव याकडे दुर्लक्ष करणार्या दुकानदारांना मात्र ‘अभय’ दिले जात आहे. एकीकडे अधिक गर्दीचे कारण देत अनेक मंगल कार्यालयांकडून दहा हजार रुपयांचे दंड घेतले गेले, तर दुसरीकडे तसाच प्रकार करणार्या दुकानदारांना मात्र दोन ओळीच्या ‘हमीपत्रावर’ सोडून देण्यात आले आहे. एकाच गोष्टीसाठी दोघांना वेगळा न्याय का? असा सवाल आता विचारला जात आहे.

