नॉट रिचेबल वरवंडी लवकरच होणार नेटवर्कयुक्त…! शिवप्रतिष्ठानचे राहुल ढेंबरे यांच्या पाठपुराव्याला यश

नायक वृत्तसेवा, घारगाव
मागील सहा महिन्यांपासून वरवंडी (ता.संगमनेर) परिसरातील नागरिकांना मोबाइलला नेटवर्क नसल्याने मनःस्ताप व गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याबाबत शिवप्रतिष्ठानचे राहुल ढेंबरे यांनी रिलायन्स जिओकडे पाठपुरावा केला असता त्यास यश आले आहे. यामुळे लवकरच वरवंडी नेटवर्कयुक्त होणार आहे.

वरवंडीच्या सरपंच किरण गागरे, पती गणेश गागरे व वरवंडी परिसरातील सामाजिक बांधिलकी जपणारे युवक यांच्यामार्फत जिओमध्ये असणारे जास्तीत जास्त सिमकार्ड पोर्टिंग विनंती टाकून जिओला नेटवर्क अडचणींविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला पण जिओने काही दखल घेतली नाही. अखेर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांच्याशी चर्चा करुन नॉटरिचेबल वरवंडी गाव लवकरात लवकर नेटवर्कयुक्त कसे होईल यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले.

त्यानुसार शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून या अडचणीविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यापर्यंत चर्चा केली. त्यानंतर राहुल ढेंबरे यांनी दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सचिवालयाचे विशेष कर्तव्यावर अधिकारी आर. के. शर्मा यांनी ह्या पत्राला गांभीर्य लक्षात घेऊन प्राधान्याने सोडविण्यात यावा अशी सूचना केली. याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या कार्यालयाने, जिओने लवकरच नेटवर्क पथक नियुक्त करुन अहवाल आल्यानंतर योग्य त्या उपाययोजना करून वरवंडी परिसराला पुढील 2 ते 3 महिन्यांत नेटवर्क उपलब्ध होईल असे आश्वासन दिले. त्यानंतर आज वरवंडी गावामध्ये टॉवरचे काम सुरु झाल्याने सर्व स्तरातून शिवप्रतिष्ठानच्या पाठपुराव्याचे स्वागत होत आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 116003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *