नांदूर खंदरमाळमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जांबूतमध्ये चार शेळ्या ठार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शुक्रवारी (ता.19) पहाटे बिबट्याने नांदूर खंदरमाळ येथील एका पशुपालकाच्या वासरावर हल्ला चढवत जागीच ठार केले आहे. यामध्ये शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नांदूर खंदरमाळ येथील पशुपालक रमेश दगडू धुमाळ यांची घराशेजारीच शेड आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे वासरू बांधलेले होते. शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने शेडमध्ये घुसून त्याच्यावर हल्ला करत जागीच ठार केले. यावेळी शेडमधील गायांचा आवाज आल्याने धुमाळ हे झोपेतून जागे झाले आणि शेडकडे आले असता तर समोर वासरू मृतावस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वनरक्षक सविता थोरात, वनसेवक रोहिदास भोईटे यांनी घटनास्थळी धाव घेत मृत वासराचा पंचनामा केला आहे. दरम्यान, दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढतच आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
