व्यापार्‍यांकडून कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन! ग्राहकांनी विश्वासाने यावे आणि सुरक्षितपणे खरेदीचा आनंद लुटावा

नायक वृत्तसेवा, संगमनेर

मुख्यालयानंतर जिल्ह्यातील सर्वाधिक समृद्ध असणार्‍या आणि दिवाळीच्या निमित्ताने शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होणार्‍या संगमनेरच्या बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने व्यापार्‍यांसह नागरिकांसाठीही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. येथील बहुतेक व्यापार्‍यांनी त्याचे तंतोतंत पालन केल्याचे चित्र दिसत असून खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांनीही नियमांच्या अधीन राहूनच खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन व्यापार्‍यांकडून केले जात आहे.

मुळा व प्रवरा या मोठ्या नद्यांसह अन्य छोट्या उपनद्यांच्या प्रवाहाने सुजलाम्-सुफलाम् होण्यासह पुणे-नाशिक आणि मुंबई या महानगरांच्या त्रिकोणीय श्रृंखलेत असल्याने संगमनेर तालुक्याचा झपाट्याने विकास झाला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्वाधिक प्रगत तालुका म्हणून संगमनेरचा विशेष लौकिक आहे. येथील समृद्ध असलेली बाजारपेठ केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील खरेदीदारांनाही नेहमीच आकर्षित करीत असते.

हिंदू धर्मियांच्या दिवाळी सणाला तर महिनाभर संगमनेरची बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने ओसंडलेली असते. येथील किरकोळ व घाऊक कापड, किराणा व भुसार माल, तेल व तुप, सुवर्ण अलंकार आदिंचे मोठे दुकानदार आहेत. त्यात प्रामुख्याने राजेंद्र क्लॉथ स्टोअर्स, राजपाल क्लॉथ स्टोअर्स, कृष्णा टेक्सटाईल मार्केट, शुभम टेक्सटाईल मार्केट, भंडारी क्लॉथ स्टोअर्स, रेमण्ड शॉपी, पडताणी मार्केट, भंडारी व पारख ऑईल मिल यांसह फटाके व सुवर्णकारांची असंख्य दालने आहेत. या सर्वांच्या एकत्रिकरणातून दरवर्षी दिवाळीच्या एकट्या सणामध्ये येथील बाजारपेठेत शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होत असते.

यंदा मात्र देशाला अद्यापही कोविडचा विळखा असल्याने यापूर्वी पार पडलेल्या उत्सवांप्रमाणेच दिवाळीसाठीही शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचे यासर्व मोठ्या दुकानदारांसह छोट्या-छोट्या दुकानदारांनीही तंतोतंत पालन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सणानिमित्त बाजारपेठेत येणारा ग्राहक समाधानाने आणि सुरक्षिततेने खरेदी करतोय. प्रत्येक दुकानाच्या बाहेर थर्मल स्कॅनर (तापमापी), सॅनिटायझरची सोय करण्यात आली असून मास्क असल्याशिवाय कोणालाही दुकानात प्रवेश दिला जात नाही. दुकानात प्रत्यक्ष खरेदी करतानाही सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचे दोहींकडून पालन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी मनात कोणताही संकोच न ठेवता नियमांच्या अधीन राहून खरेदीसाठी यावे असे आवाहन व्यापार्‍यांकडून करण्यात आले आहे.

कोविडचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नसल्याने दुकानदार आणि ग्राहक दोघांनीही अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. याचे संपूर्ण भान असल्याने व ग्राहक हा राजा असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. दुकानातील काऊंटरवर अनावश्यक गर्दी होणार नाही याचीही काळजी आम्ही घेत आहोत. ग्राहकांनी पूर्ण विश्वासाने राजेंद्र क्लॉथ स्टोअर्समध्ये यावे आणि मनमुराद व सुरक्षित खरेदीचा आनंद घ्यावा.

कैलास सोमाणी

राजेंद्र क्लॉथ स्टोअर्स, संगमनेर

अनलॉक सुरु झाल्यापासूनच आम्ही त्यादृष्टीने सर्व काळजी घेत आहोत. त्यामुळेच आत्तापर्यंत संगमनेरातील कोणत्याही दुकानांतून कोणी बाधित होवून गेल्याचे एकही उदाहरण नाही. दिवाळीला दुकानांमध्ये मोठी गर्दी असते. त्यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेतली असून शासनाने जारी केलेल्या प्रत्येक सूचनेचे पूर्ण पालन करीत आहोत. प्रत्येक ग्राहकाचा ताप मोजण्यासह सॅनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतराबाबतही आम्ही गांभिर्याने लक्ष देत आहोत.

सोनू राजपाल

राजपाल क्लॉथ स्टोअर्स, संगमनेर

Visits: 12 Today: 1 Total: 116580

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *